मुंबई : सलग पाच वेळा व्याजदर कपात करणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेने यंदा अनपेक्षितपणे रेपो दरात कपात टाळल्याचा गुरुवारी भांडवली बाजारालाही धक्का बसला. त्याचबरोबर चालू आर्थिक वर्षांत महागाई वाढीच्या शक्यतेसह घसरत्या विकास दराबाबतच्या रिझव्‍‌र्ह बँक गव्हर्नरांच्या अंदाजाची धास्तीही गुंतवणूकदारांमध्ये दिसली.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आठवडय़ाच्या चौथ्या सत्रअखेर ७०.७० अंश घसरणीसह ४०,७७९.५९ वर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक २४.८० अंश घसरणीने १२,०१८.४० पर्यंत खाली आला. दोन्ही प्रमुख निर्देशांक बुधवारच्या तुलनेत पाव टक्क्यापेक्षाही कमी प्रमाणात घसरले.

सलग तीन दिवसांच्या बैठकीनंतर रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण समितीने रेपो आदी दर विद्यमान पातळीवर स्थिर ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. परिणामी गेल्या काही सत्रांपासून व्याजदर कपातीची आशा बाळगून असलेल्या गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात समभाग विक्री केली. त्याबरोबरच अर्थव्यवस्थेच्या आगामी प्रवासाबाबतची चिंताही व्यवहारा दरम्यान दिसून आली.

गुरुवारच्या सत्राची सुरुवात तेजीसह झाली. मात्र दुपारपूर्वीच रिझव्‍‌र्ह बँकेचे दर स्थिर राहणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बाजारातील व्यवहाराच्या अखेपर्यंत गुंतवणूकदारांचे समभाग विक्रीचे प्रमाण वाढले. व्याजदराशी निगडित क्षेत्रातील समभागही गुरुवारच्या घसरणीत सहभागी झाले. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप घसरले, तर स्मॉल कॅप मात्र स्थिर राहिला.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये पोलादाला घसरणीचा अधिक फटका बसला. तर भांडवली वस्तू, माहिती तंत्रज्ञान निर्देशांकात मात्र सत्रअखेरही वाढ कायम राहिली.

बँक, वाहन समभागांची आपटी

रिझव्‍‌र्ह बँकेच्या स्थिर व्याजदरामुळे बँकाकडून कर्ज स्वस्ताईची आशा मावळल्याने कमकुवत बनलेल्या व्यवसायात सुधाराच्या शक्यता नसल्याने बँक, वाहन क्षेत्रातील समभागांमध्ये गुरुवारी मोठी मूल्य दिसून आली. इंडसइंड बँक, आरबीएल बँक, स्टेट बँक तसेच टाटा मोटर्स, हिरो मोटोकॉर्प, अशोक लेलँड आदी जवळपास २ टक्क्यांपर्यंत घसरले. स्थावर मालमत्ता क्षेत्रातील सूचिबद्ध कंपन्यांच्या समभागात मात्र संमिश्र मूल्य हालचाल नोंदली गेली.