गेल्या सलग तीन सत्रांपासून तेजीसह विक्रमी शिखर गाठणाऱ्या भांडवली बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांनी गुरुवारी माघार घेतली. मोठय़ा घसरणीने दोन्ही प्रमुख निर्देशांक त्यांच्या सर्वोच्च टप्प्यापासून दुरावले आहेत.

दोलायमान व्यवहाराखेर सेन्सेक्स बुधवारच्या तुलनेत ५८०.०९ अंश घसरणीसह ४३,५९९.९६ वर थांबला. तर १६६.५५ अंश घसरणीने निफ्टी १२,७७१.७० पर्यंत स्थिरावला. दोन्ही निर्देशांकात प्रत्येकी सव्वा टक्के घसरण झाली.

मुंबई शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकाने गुरुवारच्या सत्रात ४४,२३० हा सर्वोच्च टप्पा अनुभवला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी व्यवहारात प्रथमच १२,९६३ पर्यंत झेपावला होता. गुरुवारी बाजारातील व्यवहार थंडावले तेव्हा मात्र सेन्सेक्सने ४४ हजार पुढील तर निफ्टीने १३ हजारानजीकचा स्तर सोडला.

गुंतवणूकदारांच्या नफेखोरीपेक्षा जागतिक बाजारातील घसरणीवर नजर ठेऊन येथील व्यवहार झाले. सेन्सेक्समध्ये स्टेट बँक सर्वाधिक, ५ टक्के घसरणीसह खाली आला. त्याचबरोबर अ‍ॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक  आदी बँक, वित्त क्षेत्रातील समभागांचे मूल्य घसरले.

पॉवरग्रिड, आयटीसी, एनटीपीसी, टाटा स्टील, टायटन आदी काही प्रमाणात तेजी नोंदविणारे समभाग ठरले. अनेक क्षेत्रीय निर्देशांक घसरणीच्या यादीत राहिले. तर मिड व स्मॉल कॅप वाढले.