सप्ताहारंभीच्या सत्रातील अस्थिरता संपुष्टात आणताना प्रमुख भांडवली बाजार निर्देशांक सोमवारी महिन्याच्या किमान स्तरावर विसावले. ६५.५९ अंश घसरणीसह सेन्सेक्स २८,४३७.७१ वर तर निफ्टी १४.६० अंश घसरणीमुळे ८,६३३.१५ वर स्थिरावला. सलग दुसऱ्या सत्रातील घसरणीमुळे प्रमुख निर्देशांक त्यांच्या महिन्यातील नव्या तळात विसावले आहेत.
चालू आठवडय़ातच अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्ह बँकेची व्याजदर भूमिका आणि येत्या महिन्यातील रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरण यावर गुंतवणूकदारांची नजर आहे. फेब्रुवारीतील किरकोळ महागाई दर किंचित वर (५.३७%) गेला असतानाच याच महिन्यातील घाऊक महागाई निर्देशांकाने मात्र पुन्हा उणे (-२.०६%) प्रवास नोंदविला आहे.