सलग तिसऱ्या सत्रातील निर्देशांक घसरणीमुळे सेन्सेक्सने मंगळवारी २८ हजारांपासून फारकत घेतली. २१.४१ अंश घसरणीमुळे मुंबई निर्देशांक २७,९८१.७१ वर थांबला. प्रमुख निर्देशांकाचा हा सप्ताहतळ ठरला. १३.६५ अंश घसरणीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,६२२.९० पर्यंत स्थिरावला. जूनमध्ये आठ प्रमुख क्षेत्राने तसेच निर्मिती खरेदी व्यवस्थापक निर्देशांकाने नोंदविलेली उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर मुंबई शेअर बाजारातील व्यवहार तेजीद्वारे सुरू झाले. वस्तू व सेवा कर विधेयकावर राज्यसभेत बुधवारपासून चर्चा होणार असल्याने बाजारात उत्साह होता. जून ते सप्टेंबरदरम्यान मान्सून उत्तम राहणार असल्याच्या वेधशाळेच्या अंदाजामुळे गुंतवणूकदारांनीदेखील निवडक समभागांमधील खरेदीवर भर दिला.
गेल्या दोन व्यवहारांत मुंबई निर्देशांकाने २०५.४८ अंश घसरण नोंदविली आहे.मंगळवारी सेन्सेक्समधील टाटा मोटर्स, एचडीएफसी, अदानी पोर्ट्स, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, गेल, विप्रो, सिप्ला, ल्युपिन, कोल इंडिया, सन फार्मा, महिंद्र अँड महिंद्र, टाटा स्टील यांचे मूल्य घसरले. सेन्सेक्समधील एकूण ३० पैकी १८ कंपन्यांचे समभाग मूल्य रोडावले.क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये पोलाद, स्थावर मालमत्ता, ऊर्जा, पायाभूत सुविधा, आरोग्यनिगा १.७८ टक्क्यांपर्यंत घसरले. मुंबई शेअर बाजारातील स्मॉल व मिड कॅप निर्देशांक अनुक्रमे ०.८३ व ०.६२ अंशांनी खाली आले.