तेलदरातील ताज्या उताराने जगभरात सर्वत्र पडझड
सलग तिसऱ्या दिवसातील सेन्सेक्सच्या घसरणीने स्थानिक भांडवली बाजाराला पुन्हा मंदीने घेरल्याचे बुधवारच्या व्यवहारांतून दिसून आले. आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या किमतीत पुन्हा तीव्र उतरंड सुरू झाल्याने जागतिक स्तरावर सर्वच बाजारांमध्ये घबराटीचे सावट स्थानिक बाजारावरही दिसले. चीनच्या अर्थमंदीचा धक्का ताजा असताना, तेलाच्या दरातील मंदीसदृश अस्वस्थतेने समभाग बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण केली आहे. बाजारात विक्रीचा जोर राहिल्याच्या परिणामी निर्देशांकांत मोठी घसरण झाली.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक – सेन्सेक्स ३१५.६८ अंशांनी (१.२९ टक्के )घसरून २४,२२३.३३ वर घरंगळला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक ९३.७५ अंशांनी (१.२६ टक्के) घसरून ७,३६१.८० वर बुधवारी बंद झाला. मुंबई शेअर बाजारात घसरणीचे स्वरूप सर्वदूर होते. प्रत्येक पाच घसरणाऱ्या समभागांच्या तुलनेत केवळ एका समभागांत वाढ दिसून आली. परिणामी बीएसई मिडकॅप आणि स्मॉल कॅप या मधल्या फळीतील समभागांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या निर्देशांकांमध्ये प्रत्येकी १.३ टक्के असे घसरणीचे प्रमाण तुलनेने अधिक राहिले.
मंगळवारच्या व्यवहारातही रिझव्‍‌र्ह बँकेच्या अर्थव्यवस्थेवरील कठोर भाष्यावर रूष्ट होत निफ्टी १००.४० आणि सेन्सेक्स २८५.८३ अशा साधारण एक टक्क्य़ांहून अधिक घसरणीसह बाजार बंद झाला होता. बुधवारच्या आणखी मोठय़ा घसरणीची भर पडून, निर्देशांकांनी पुन्हा दोन आठवडय़ापूर्वीच्या तळाला लोळण घेतली आहे. भारताच्या सेवा क्षेत्रात उभारी दर्शविणाऱ्या जानेवारीच्या पीएमआय सर्वेक्षणात आदल्या महिन्यांतील ५३.६ वरून ५४.३ अशी दमदार वाढही बाजारातील नकारात्मकतेला कमी करण्यास असमर्थ ठरली. सेन्सेक्सच्या ३० पैकी केवळ हिंदुस्तान युनिलिव्हर (२.६६ टक्के), टीसीएस (०.७७ टक्के) आणि सन फार्मा व बजाज ऑटो प्रत्येकी (०.२४ टक्के) असे चार समभाग वधारले. मुंबई शेअर बाजारातील ग्राहकोपयोगी उत्पादने वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरणीत राहिले.

रुपयाने ६८ ची वेस ओलांडली
भांडवली बाजारातून सुरू असलेल्या विदेशी वित्ताचे पलायन आणि त्यांच्याकडून वाढलेल्या अमेरिकी डॉलरच्या मागणीचा विपरीत परिणाम रुपयाच्या विनिमय मूल्यावर सुरू असून, बुधवारच्या व्यवहारात त्याने प्रति डॉलर ६८ ची वेस ओलांडली. नऊ पैशांच्या ताज्या घसरणीने बुधवार अखेर रुपयाचा विनिमय दर ६८.०७ वर स्थिरावला. सकाळी ६८.२६ या चिंताजनक स्तरावरून आंतरबँक व्यवहारांना सुरुवात करणाऱ्या रुपयाने दिवसात ६७.९८ पर्यंत सुधारही दाखविला होता. गत तीन दिवसांत भांडवली बाजारातील घसरणीची साथ देत रुपयानेही प्रति डॉलर २९ पैसे गमावले आहेत.

खनिज तेलातील घसरणीने घबराट..
आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या किमती सप्ताहअखेर दाखविलेली उसळी अल्पजीवी ठरली आणि मंगळवारी ब्रेन्ट क्रूड आणि न्यूयॉर्क बाजारातील नायमेक्स या तेलाच्या प्रमुख बाजारांमध्ये प्रतिपिंप किमतीत अनुक्रमे ४.४ टक्के आणि ५.५ टक्के असा तीव्र स्वरूपाचा उतार दिसून आला. तेलातील हा उतार बुधवारच्या प्रारंभिक व्यवहारातही सुरू राहिला आणि किमती प्रतिपिंप पुन्हा ३० डॉलरखाली उतरल्या. त्याचे सावट म्हणून भांडवली बाजारात घबराट निर्माण झाली. प्रमुख आशियाई बाजार घसरणीसह बंद झाले. जपानचा निर्देशांक – निक्केई आणि हाँगकाँगचा हँगसेंग या निर्देशांकांनी २ ते ३ टक्क्य़ांनी गडगडले. ते पाहून स्थानिक बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीने बुधवारच्या व्यवहाराची सुरुवात मोठय़ा घसरणीसह केली. माध्यान्हीला खुल्या झालेल्या युरोपीय बाजारांची सुरुवातीचे व्यवहार मंदीचे राहिले. अर्थात स्थानिक बाजार बंद झाल्यावर खनिज तेलाच्या दरांत उलटफेर होऊन, त्यांनी मंगळवारच्या तुलनेत उसळी घेतल्याचे दिसून आले.