निफ्टीला ७५००ची पातळी राखण्यात यश; सेन्सेक्स मात्र १९ महिन्यापूर्वीच्या तळाला

गृह वित्त क्षेत्रातील समभागांवर सावट

सेबीने म्युच्युअल फंडांवर लागू केलेल्या गृह वित्त कंपन्यांच्या रोखे गुंतवणुकीवरील मर्यादेनंतर संबंधित कंपन्यांमधील घसरणही एकूण भांडवली बाजाराच्या पडझडीत सामील झाली. सेबीने फंडांची गृह वित्त कंपन्यांच्या रोख्यांमधील गुंतवणूक मर्यादा ३० टक्क्यांवरून २५ टक्क्यांवर आणून ठेवली आहे. बाजार नियामकाने सोमवारी घेतलेल्या या निर्णयाचे गृह वित्त कंपन्यांच्या समभागमूल्यावर सावट उमटले. एचडीएफसी, दिवाण हाऊसिंगसारख्या सूचिबद्ध गृह वित्त कंपन्यांचे समभाग ३.३० टक्क्यांपर्यंत घसरले.

भांडवली बाजारातील घसरण मंगळवारीही कायम राहिली. सायंकाळी उशिरा जाहीर होणाऱ्या देशाच्या अर्थप्रगतीच्या आकडेवारीबाबत साशंकता व्यक्त करत गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीचे धोरण पुन्हा अनुसरले. १४३.०१ अंश घसरणीसह सेन्सेक्स २४,५९७.११ वर आला. तर ५३.५५ अंश घसरणीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७,५१०.३० पर्यंत येऊन ठेपला. मुंबई निर्देशांकाने १९ महिन्यांचा नवा तळ मंगळवारी राखला.

मुंबई शेअर बाजारात २०१६ मध्ये झालेल्या आठ व्यवहारांपैकी केवळ एकाच सत्रात निर्देशांकाला वाढ नोंदविता आली आहे. मंगळवारच्या घसरणीने सेन्सेक्सने ३० मे २०१४ नंतरचा किमान स्तर राखला आहे. गेल्या सलग घसरणीने मुंबई निर्देशांक केंद्रात मोदी सरकार स्थानापन्न होण्यापूर्वीच्या पातळीवर स्थिरावला आहे. याच महिन्यात दोन व्यवहारांत मुंबई निर्देशांक प्रत्येकी ५०० हून अधिक अंशाने कोसळला आहे.

मंगळवारी बाजार व्यवहारानंतर जाहीर होणाऱ्या टाटा समूहातील टीसीएस या माहिती तंत्रज्ञान कंपनीच्या तिसऱ्या तिमाही निकालाची धास्तीही बाजारात व्यवहारादरम्यान उमटली. आंतरराष्ट्रीय स्तरावर ३१ डॉलपर्यंत येत असलेल्या खनिज तेल दर तसेच चिनी निर्देशांकातील आपटी याचाही येथील बाजारावर विपरीत परिणाम झाला. डिसेंबरमधील किरकोळ महागाई व औद्योगिक उत्पादन दर सायंकाळी उशिरा जाहीर झाले.

सेन्सेक्समधील ३० पैकी २१ समभागांचे मूल्य घसरले. यामध्ये अ‍ॅक्सिस बँक, टाटा स्टील, स्टेट बँक, ओएनजीसी, एअरटेल, टाटा मोटर्स, हीरो मोटोकॉर्प, आयसीआयसीआय बँक, गेल, एचडीएफसी बँक, बजाज ऑटो, डॉ. रेड्डीज्, रिलायन्स, मारुती सुझुकी यांचा समावेश राहिला. तर बँक, स्थावर मालमत्ता, पोलाद, तेल व वायू, सार्वजनिक कंपनी, माहिती तंत्रज्ञान घसरणीचा फटका बसला.

तिमाही निकाल जाहीर करणाऱ्या टीसीएसचा समभाग दिवसअखेर १.६५ टक्क्यांनी घसरला. व्यवहारात मात्र त्याने २,३०१.१० हा वर्षभरातील तळमूल्य नोंदविला. मुंबई शेअर बाजारातील स्मॉल व मिड कॅप निर्देशांक एक टक्क्यापर्यंत घसरले. आशियाई बाजारांमधील तेथील प्रमुख निर्देशांक २.७० टक्क्यांपर्यंत घसरले. तर युरोपीय बाजारांची सुरुवात मात्र तेजीसह झाली. या भागातील फ्रान्स, जर्मनी, ब्रिटनच्या प्रमुख निर्देशांकांमध्ये १.२० टक्क्यांपर्यंत वाढ नोंदली जात होती.