शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या नफेखोरीचे सत्र सलग दुसऱ्या दिवशीही कायम राहिले. द्विमासिक पतधोरणात रिझव्‍‌र्ह बँकेने स्थिर व्याजदराचा अपेक्षित निर्णय घेतल्याने शेअर बाजारात सोमवारसारखेच चित्र दिसले.
सत्रात अस्थिरता नोंदविल्यानंतर सेन्सेक्सने ११५.६१ अंश घसरणीने २८,४४४.०१ पर्यंत अखेर केली. तर निफ्टीत ३१.२० अंश घट होऊन राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक ८५२४.७० वर स्थिरावला. डॉलरच्या कमकुवततेपोटी माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी घसरणीत हिस्सा राखला.सप्ताहारंभी सेन्सेक्ससह निफ्टीने सर्वोच्च टप्प्यापासून माघार घेण्याचे धोरण अवलंबिले होते. गेल्या आठवडय़ात सर्वोच्च टप्प्यावर नेऊन ठेवणाऱ्या सेन्सेक्समध्ये जवळपास सव्वाशेहून अधिक अंशांची घसरण नोंदविण्यास गुंतवणूकदारांनी भाग पाडले.
मंगळवारी सलग पाचव्यांदा स्थिर व्याजदराचे पतधोरण जाहीर होत असतानाही बाजार नरमच होता. व्यवहारात निफ्टीदेखील ८५६०.२०च्या पुढे जाऊ शकला नाही. तेल कंपन्यांचे समभागही विक्रीच्या क्रमवारीत समाविष्ट झाले. मिड व स्मॉल कॅप निर्देशांक मात्र अर्धा ते एक टक्का वधारणेत होते. सेन्सेक्समधील निम्म्या कंपन्यांचे समभाग मूल्य घसरले. माहिती निर्देशांक सर्वाधिक १.४८ टक्क्य़ांनी घसरला.

रुपया सावरला
मुंबई: डॉलरच्या तुलनेत रुपया मंगळवारी अखेर ६२च्या तळातून बाहेर आला. एकाच व्यवहारात तब्बल १४ पैशांनी उंचावत तो ६१.८८ पर्यंत सावरला. समाधानकारक सुरुवात करणारा रुपया व्यवहारात ६१.८७ पर्यंत वधारला होता. रुपया सोमवारी ६२च्या खाली होता. गेल्या अनेक सत्रांपासून तो ६२च्या तळातील प्रवास नोंदवीत होता. २८ नोव्हेंबर रोजी एकाच व्यवहारातील तब्बल १६ पैशांच्या आपटीमुळे चलन ६२च्या घरात पोहोचले होते.

सोन्याची झेप
नवी दिल्ली : राजधानीत मौल्यवान धातू दराने मंगळवारी एकाच व्यवहारात मोठी उसळी घेतली. सोन्याचा तोळ्याचा भाव एकदम ८४० रुपयांनी उंचावत २७,०४० रुपयांवर गेला. महिन्याभरानंतर सोन्याला ही दरझळाळी प्राप्त झाली. ३० ऑक्टोबर रोजी सोने यापूर्वी या पातळीवर होते. यामुळे गेल्या सहा सत्रातील त्याची ७३० रुपयांची घसरणही काही प्रमाणात भरून निघाली. तर चांदीचा किलोचा भावही मंगळवारी एकदम २७०० रुपयांनी वधारला.