News Flash

सलग तेजीनंतर आता नफेखोरीने घसरणीचा क्रम

प्रत्यक्षात डिसेंबरचे वायदापूर्तीचे व्यवहार गुरुवारी निर्देशांकातील मोठय़ा घसरणीने झाले.

मुंबई : सलग दोन दिवसांतील घसरणीनंतर भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक महिन्यातील वायदापूर्तीच्या व्यवहारात दणक्यात घसरले. सेन्सेक्स आणि निफ्टीतील आघाडीच्या समभागांवर विक्रीचा दबाव राहिल्याने भांडवली बाजारात गुरुवारी पाऊण टक्क्यापर्यंत घसरण नोंदली गेली.

आठवडय़ाच्या तिसऱ्या व्यवहार सत्रात सेन्सेक्स २७०.५० अंश घसरणीसह ४१,१६३.७६ वर, तर ८८ अंश घसरणीसह निफ्टी १२,१२६.५५ पर्यंत स्थिरावला. मुंबई निर्देशांकातील गुरुवारच्या सत्रातील तळ व्यवहारातील ३२८.३७ अंश आपटीमुळे ४१,१३२.८९ पर्यंत होता.

नाताळच्या सुटीनिमित्त बुधवारी भांडवली बाजारात व्यवहार झाले नाहीत. याबाबत ‘लोकसत्ता अर्थसत्ता’मध्ये मंगळवारी महिन्यातील वायदापूर्तीचे अखेरचे व्यवहार झाल्याचा चुकीचा उल्लेख अनावधानाने झाला. प्रत्यक्षात डिसेंबरचे वायदापूर्तीचे व्यवहार गुरुवारी निर्देशांकातील मोठय़ा घसरणीने झाले.

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये भारती एअरटेल सर्वाधिक, २.२३ टक्क्यांसह घसरणीत सर्वात वर राहिला. त्याचबरोबर रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन अँड टुब्रो, सन फार्मा, एचडीएफसी बँक, मारुती सुझुकी, टायटन कंपनी, कोटक महिंद्र बँक यांचेही मूल्य घसरले.

याउलट ओएनजीसी, एनटीपीसी, टाटा स्टील, बजाज फायनान्स, महिंद्र अँड महिंद्र यांचे मूल्य १.६३ टक्क्यांपर्यंत वाढले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये दूरसंचार, ऊर्जा, भांडवली वस्तू, बँक, तेल व वायू, आरोग्यनिगा आदी १.७३ टक्क्यांपर्यंत घसरले, तर पोलाद निर्देशांक अर्ध्या टक्क्यापर्यंत वाढला.

रुपयाचा त्रिसप्ताह तळ

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमतीतील उसळीचा दबाव गुरुवारी परकीय चलन विनिमय मंचावर दिसून आला. परिणामी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनिमय मूल्याने तीन आठवडय़ांची किमान पातळी गाठली. मंगळवारच्या तुलनेत स्थानिक चलन एकाच व्यवहारात चार पैशांनी खाली येत ७१.३१ या त्याच्या तीन आठवडय़ांपूर्वीच्या तळात स्थिरावले. गुरुवारच्या सत्राची ७१.२६ स्तरावर सुरुवात करणारा रुपया व्यवहारादरम्यान ७१.३५ पर्यंत घसरला होता. तर ७१.२२ हा त्याचा व्यवहारातील वरचा टप्पा राहिला. गेल्या गुरुवारपासून रुपयातील घसरण ही ३४ पैसे म्हणजे जवळपास अर्धा टक्का नोंदली गेली आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रति पिंप ६७ डॉलरपुढे मार्गक्रमण करणाऱ्या खनिज तेलाच्या किमती आता महिन्याच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2019 12:14 am

Web Title: sensex falls over 270 points stock market news zws 70
Next Stories
1 खातं बंद करतानाही बँक कशासाठी आणि किती रक्कम घेते?; जाणून घ्या
2 समाजमाध्यमांवरील मराठी-हिंदीतून अस्सल टिप्पण्या दशकोटींवर; ‘शेअरचॅट’चा दावा
3 जीएसटीअंतर्गत केवळ दोन कर टप्प्यांचा आग्रह
Just Now!
X