मात्र २०१५ मध्ये सेन्सेक्सची ५ टक्के घसरण
२०१५च्या अखेरच्या सत्राची नोंद भांडवली बाजाराने तेजीने केली खरी; मात्र या सरत्या एकूण वर्षांत मुंबई निर्देशांकातील घसरण तब्बल पाच टक्क्यांची राहिली. सेन्सेक्समधील ही गेल्या चार वर्षांतील – २०११ नंतरची पहिली आपटी ठरली. १०० कोटी रुपयांच्या बाजारमूल्यांचा टप्पा गाठणाऱ्या मावळत्या वर्षांत गुंतवणूकदारांनी मात्र २ लाख कोटी रुपये कमावले.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स गुरुवारी १५७.५१ अंश वाढीसह २६ हजाराच्या पुढे जाताना २६,११७.५४ वर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये अर्धशतकी, ५०.१० अंश भर पडून प्रमुख निर्देशांक ७,९४६.३५ वर बंद झाला.
भांडवली बाजाराचा २०१५ मधील गुरुवारचा शेवटचा दिवस होता. तसेच महिन्यातील वायदापूर्तीचीही अखेर गुरुवारीच होती. (ख्रिसमसनिमित्त बाजाराला सुटी असल्याने गेल्या गुरुवारी हे व्यवहार होऊ शकले नाहीत.) वर्षांच्या अखेरच्या व्यवहाराची बाजाराची सुरुवातच तेजीसह झाली.
गुरुवारी सकाळी बाजार ४२ अंशांची वाढ नोंदवीत सुरू झाला. मुंबई निर्देशांक या वेळीच २६ हजारापुढे गेला. बुधवारी निर्देशांक नफेखोरीमुळे या टप्प्यावरून ढळला होता. व्यवहारातही २६ हजारापुढे राहणारा सेन्सेक्स सत्र अखेरच्या टप्प्यानजीकच २६,१४७.६३ पर्यंत झेपावला.
जानेवारी ते डिसेंबर २०१५ दरम्यान सेन्सेक्स १,३८२ अंशांनी घसरला आहे. ३१ डिसेंबर २०१४ रोजी मुंबई निर्देशांक २७,४९९.४२ वर थांबला होता. २०१५ मध्ये सेन्सेक्सचा २४,८३३.५४ हा वार्षिक तळ ८ सप्टेंबर रोजी नोंदला गेला. तर वार्षिक तुलनेत निफ्टीचीही २०११ नंतरची पहिली घसरण २०१५ मध्ये नोंदली गेली आहे. निर्देशांक वर्षभरात ४ टक्क्यांनी खाली आला.
२०१५ मध्ये पोलाद, बँक या कर्जभार उचलणाऱ्या क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग मूल्यांवर विपरीत परिणाम झाल्याचे स्पष्ट झाले आहे. संपूर्ण वर्ष बाजारासाठी लक्षणीय चढ-उताराचे ठरले. केंद्रात मोदी सरकार स्थापन होत असताना, मे २०१४ मध्ये अनोख्या टप्प्यावर असलेला हा बाजार मात्र ऑगस्ट २०१५ पासून अस्वस्थ झाला. याच दरम्यान थेट विदेशी गुंतवणूकदार संस्थांनीही भांडवली बाजारातून काढता पाय घेतला. सावरत असलेल्या अमेरिकेमुळे हे घडत होते. मार्च २०१५ मध्ये सेन्सेक्स ३०,०२४ या सर्वोच्च स्थानी होता. २०१४ मध्ये सेन्सेक्सने तब्बल ३० टक्क्यांची वाढ नोंदविली होती. यापूर्वी मुंबई निर्देशांक २०११ मध्ये मोठय़ा प्रमाणात, २४ टक्क्यांनी घसरला होता. निफ्टीनेही २०१५ मध्ये ९,००० हा सर्वोच्च स्तर अनुभवला.
सेन्सेक्सने २०१५ मध्येच २४ ऑगस्ट रोजी सत्रातील सर्वात मोठी निर्देशांक आपटी राखली आहे. या दिवशी सेन्सेक्स १,६२४.५१ अंशांनी रोडावला होता. टक्केवारीत हे प्रमाण ५.९४ होते. चीनने चलनाचे अवमूल्यन केल्याने हे घडले होते.
२०१५ ची अखेर होत असतानाच मुंबई शेअर बाजाराने १०० लाख कोटी रुपयांच्या बाजार मूल्यही गाठले. ३१ डिसेंबर अखेरही ते १,००,३७,७३४ कोटी रुपयांपुढे राहिले. बाजारातील सर्व सूचिबद्ध कंपन्यांचे हे एकूण बाजारमूल्य आहे. कंपन्यांमध्ये अर्थातच टाटा समूहातील टीसीएस ही ४.८० लाख कोटींसह श्रीमंत कंपनी ठरली.

लक्षणीय चढ-उताराचे वर्ष
* सेन्सेक्स ३१ डिसेंबर २०१४ रोजी २७,४९९.४२ वर थांबला होता, ते पाहता २०१५ सालात सेन्सेक्समध्ये १,३८२ अंशांनी घसरण
* निर्देशांक वर्षभरात ४ टक्क्यांनी खाली आला.
* २४,८३३.५४ हा २०१५ मधील सेन्सेक्सचा वार्षिक तळ ८ सप्टेंबर रोजी नोंदला गेला.
* २४ ऑगस्टला सेन्सेक्सने सत्रातील सर्वात मोठी १,६२४.५१ अंशांची आपटी दाखविली.