बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने मंगळवारी पुन्हा शतकी आपटी नोंदविली. यामुळे सप्ताहारंभीच २७,५०० पासून दुरावलेला निर्देशांक २७,२५५ नजीक आला आहे.

आठवडय़ातील दुसऱ्या व्यवहारात सेन्सेक्स १०८.५२ अंश घसरणीसह २७,२५३.४४ पर्यंत खाली आला. तर २४.०५ अंश घसरणीसह राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,२३५.४० वर स्थिरावला. सोमवारी १००हून अधिक अंशांची घसरण नोंदवीत सेन्सेक्सने नव्या सप्ताहाची सुरुवात केली होती. यानंतर मंगळवारचे बाजारातील व्यवहारही २७,२९१ या किमान पातळीवर सुरू झाले.  सत्रात निर्देशांक २७,२०९.५२ पर्यंत घसरला. गेल्या सलग दोन व्यवहारांतील मिळून सेन्सेक्सची घसरण २१७.३७ अंश राहिली आहे. यामुळे मुंबई निर्देशांक आता त्याच्या पंधरवडय़ाच्या तळात विसावला आहे.