विदेशी भांडवली बाजारांना प्रतिसाद देत मुंबई शेअर बाजाराने गेल्या दोन व्यवहारांतील घसरण रोखत निर्देशांकात जवळपास ३०० अंश भर टाकली. यामुळे सेन्सेक्स २८,५०० पुढे जाण्यात यशस्वी ठरला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये जवळपास शतकी वाढ नोंदली गेली. २९८.६७ अंश वाढीसह सेन्सेक्स २८,७३६.३८ पर्यंत पोहोचला, तर ९०.१५ अंश वाढीने निफ्टी ८,७२३.३० वर गेला.

बुधवारच्या उशिराच्या पतधोरणात अमेरिकेची फेडरल रिझव्‍‌र्ह व्याज दर वाढविणार नाही, या आशादायक विश्वासावर जगभरातील प्रमुख निर्देशांक तूर्त तेजीत आहेत. भारतातील आघाडीच्या भांडवली बाजारांनीही नेमका हाच प्रतिसाद नोंदवीत निर्देशांकाला गेल्या सलग घसरणीतून बाहेर काढले. सुरुवातीच्या वाढीनंतर मंगळवारच्या सत्रात दिवसभर उतार-वाढीचा अनुभव मुंबई शेअर बाजाराने घेतला. व्यवहारातील मध्यापर्यंत हे चित्र कायम होते. दुपापर्यंतची मुंबई निर्देशांकाची झेप ३४५ अंशांची होती. अखेरच्या टप्प्यात मात्र सोमवारच्या तुलनेत मोठी वाढ राखली गेली. तरी त्याचा दिवसाचा नीचांक २८,५००च्या आसपास, २८,४३५.४५ पर्यंतच राहिला.
औषधनिर्मिती, भांडवली वस्तू, ग्राहकोपयोगी वस्तू, तेल व वायू, पोलाद, बँक समभागांमध्ये खरेदीचा जोर दिसला. तर माहिती तंत्रज्ञान व संबंधित समभागांमध्ये नफेखोरी झाली. क्षेत्रीय निर्देशांकातील १२ पैकी केवळ दोनच निर्देशांक घसरले, तर सेन्सेक्समधील २३ समभागांचे मूल्य वाढले. त्यातही हिंदाल्को, सेसा स्टरलाईट, डॉ. रेड्डीज्, एचडीएफसी, टाटा मोटर्स, भेल, सिप्ला हे दोन टक्क्यांहून अधिक उंचावले. इन्फोसिस, कोल इंडिया, टाटा पॉवरमध्ये दबाव अनुभवला गेला. १.८२ टक्क्यांसह आरोग्यनिगा निर्देशांक तेजीत आघाडीवर राहिला.
आशियातील चीन, जपान, दक्षिण कोरिया, तैवानचे निर्देशांक २.१४ टक्क्यांपर्यंत वाढले. तर युरोपीय बाजारातील कॅक, डॅक्स आदी निर्देशांकांमध्येही अध्र्या टक्क्यापर्यंतची वाढ नोंदली गेली. अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हमार्फत बुधवारी उशिरा जाहीर होणाऱ्या पतधोरणाकडे गुंतवणूकदारांची नजर आहे. अमेरिकेतील डाऊ जोन्स निर्देशांक सोमवारी १.२९ टक्क्यांनी उंचावला होता. मुंबई निर्देशांकाने गेल्या दोन दिवसांत ४९२.७० अंश घसरण नोंदली आहे.