‘फेड’च्या पाव टक्का दरवाढीला अनपेक्षित उत्तर
अपेक्षित धरल्या गेलेल्या अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्र्हच्या व्याजदर वाढीतून संभाव्य भांडवली निचऱ्याकडे दुर्लक्ष करीत गुरुवारी येथील भांडवली बाजारात निर्देशांकांनी सलग चौथ्या सत्रात दमदार वाढ दर्शविली. बऱ्याच काळापासून अपेक्षित निर्णय प्रत्यक्षात येऊन अनिश्चितता संपुष्टात आल्याने ‘सेन्सेक्स’ने त्रिशतकी वाढीसह स्वागत केले. ‘फेड’च्या पाव टक्का व्याज दर वाढीच्या निर्णयाला दोन्ही निर्देशांकांनी सव्वा टक्क्य़ांची वाढ दाखविणारे अनपेक्षित उत्तर दिले.
भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी रात्री उशिरा जाहीर झालेल्या फेडरल रिझव्र्हच्या निर्णयाचे स्वागत बाजारात सुरुवातीच्या व्यवहारातच झाले. सेन्सेक्सने जवळपास दीडशे अंशांची वाढ नोंदवीत २५,८३१.३१ पर्यंत झेपावला. तर निफ्टीने ७,८०० चा टप्पा गाठला. परंतु ही प्रारंभिक उसळी नंतर पार ओसरून गेली. मध्यंतरात दोन्ही निर्देशांकांनी कमावलेले सर्व गमावून तुटीकडे कल दाखविला. मात्र युरोपीय बाजारातील तेजीचे अनुकरण करीत उत्तरार्धात निर्देशांकांनी पुन्हा बुधवारच्या तुलनेत दमदार उसळी घेतली.
३०९.४१ अंश वाढीसह सेन्सेक्स २५,८३१.३१ वर तर ९३.४५ अंश वाढीसह निफ्टी ७,८४४.३५ पातळीवर दिवसअखेर स्थिरावला. निर्देशांकांतील ही सलग चार सत्रांतील वाढीतून ते आता पंधरवडय़ाच्या वरच्या टप्प्यावर पोहोचले आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाही गुरुवारी अधिक भक्कम झाला. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सावरत असलेल्या खनिज तेलाच्या दरांचाही बाजारातील तेजीवर परिणाम झाला. गेल्या सलग चार व्यवहारातील मिळून सेन्सेक्समधील तेजी आता ७५० हून अधिक अंशांची राहिली आहे. मुंबई निर्देशांक आता ३ डिसेंबरनजीकच्या वरच्या टप्प्यावर पोहोचला आहे. वस्तू व सेवा कर विधेयकाबाबतची चिंता बाजाराच्या मध्यांतरातील निर्देशांक घसरणीत उमटली.
सेन्सेक्समध्ये मूल्य उंचावलेल्या समभागांमध्ये टाटा मोटर्स आघाडीवर राहिला. त्यातील वाढ ४.७६ टक्क्यांची होती. तर याच क्षेत्रातील वेदांता, हिंदाल्कोलाही मागणी राहिली. क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही हाच निर्देशांक तेजीत राहिला. रिलायन्स, बजाज ऑटो, महिंद्र अॅण्ड महिंद्र, सन फार्मा, हीरो मोटोकॉर्पही वाढले. सेन्सेक्समधील केवळ पाच समभाग घसरणीच्या यादीत राहिले. मुंबई शेअर बाजारातील स्मॉल व मिड कॅप निर्देशांक दीड टक्क्य़ाहून अधिक वाढले.

रुपया ३१ पैशांनी भक्कम; ६६.४२ वर झेप
मुंबई : अमेरिकेत पाव टक्का व्याज वाढ होणार असतानाच डॉलरच्या तुलनेत रुपया गुरुवारी ३१ पैशांनी भक्कम झाला. बुधवारच्या तुलनेत स्थानिक चलन ६६.४२ वर म्हणजे तीन आठवडय़ापूर्वीच्या उच्चाकांवर पोहोचला.चलन बाजारात रुपयाची सुरुवात ६६.६२ या भक्कमतेसह झाली. पण त्याने ६६.६७ असा तळही अनुभवला. मात्र दिवसअखेर तो सशक्त झाला. अमेरिकेने व्याजदर वाढवूनही डॉलर कमकुवत बनणे आश्यर्यकार असल्याचे बीएनपी पारिबा म्युच्युअल फंडाच्या समभाग विभागाचे निधी व्यवस्थापक श्रेयस देवळकर यांनी सांगितले.

बाजार प्रतिक्रिया
फेडरल रिझव्र्हच्या निर्णयामुळे भारतीय भांडवली बाजारातील विदेशी निधी बाहेर जाण्याची शक्यता खूपच कमी आहे. डॉलरच्या तुलनेतील रुपयाचा प्रवासही सध्या आहे त्याच स्थितीत राहण्याचा अंदाज आहे. बाजारातील अस्थिरता आता नाहीशी होऊन भारतातील मूलभूत घटकांवर गुंतवणूकदारांचे लक्ष राहील. चालू आर्थिक वर्षांत निफ्टी ५ टक्के वाढ नोंदवू शकतो. अमेरिकेवर अवलंबित्व असलेल्या माहिती तंत्रज्ञान, औषधनिर्माण क्षेत्रातील समभागांना मागणी राहील.
’ दीपेन शहा, कोटक सिक्युरिटीज

अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेची जवळपास दशकातील पहिली व्याजदर वाढ ही यंदा भारताच्या भांडवली बाजारावर फार विपरीत परिणाम करणारी ठरणार नाही. २००४ आणि २००६ मध्येही तसे चित्र नव्हते. तेव्हा दोन्ही वेळा अमेरिकेत व्याजदर वाढले होते. मात्र येथील बाजारातील हालचाल स्थिरच होती. बाजारातून विदेशी गुंतवणूकदार संस्थांचा निधी काढून घेण्याचा ओघ कायम दिसला तरी निफ्टी त्याच्या ७,७५० या स्तरापेक्षा खाली जाणार नाही.
 रोहित गडिया , कॅपिटल व्हाया ग्लोबल रिसर्च

अपेक्षेप्रमाणे फेडरल रिझव्र्हने केलेल्या व्याजदर वाढीमुळे भारतातील भांडवली बाजारात अल्प कालावधीसाठी विक्रीचा दबाव जाणवू शकतो. बाजाराला असे धक्के यापूर्वीही बसले आहेत. समभागांच्या मूल्यात काहीशी सुधारणा येण्याची शक्यता असून आयसीआयसीआय बँक, ल्युपिन, टाटा मोटर्स, कॉन्कर, कोल इंडिया, एचसीएलसारखे समभाग सकारात्मक राहतील.
 धनंजय सिन्हा, एम्के ग्लोबल फाय.सव्र्हिसेस