07 June 2020

News Flash

शेअर बाजार २२१ अंकांनी उसळला

सलग पाच दिवसांच्या घसरणीनंतर मुंबई शेअर बाजाराने मंगळवारी चांगलीच उसळी घेतली. बँकिंग, रिअल्टी आणि भांडवली वस्तूंच्या खरेदीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २२१ अंकांनी वधारला.

| July 16, 2014 03:16 am

सलग पाच दिवसांच्या घसरणीनंतर मुंबई शेअर बाजाराने मंगळवारी चांगलीच उसळी घेतली. बँकिंग, रिअल्टी आणि भांडवली वस्तूंच्या खरेदीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २२१ अंकांनी वधारला. त्यामुळे मंगळवारी बाजार बंद होताना हा निर्देशांक २५,२२८.६५ वर स्थिरावला.
गेल्या पाच दिवसांमध्ये मुंबई शेअर बाजाराची ११०० अंकांनी घसरण झाली होती. मात्र मंगळवारी बाजाराने ०.८९ टक्क्यांनी उसळी घेतली. स्मॉल कॅप आणि मिड कॅप कंपन्यांनीही दोन टक्क्यांची वाढ दर्शवली. किरकोळ गुंतवणूकदारांकडून वाढलेली मागणी हे याचे मुख्य कारण होते.
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या निर्देशांकात अर्थात निफ्टीतही ७२.५० अंकांची वाढ दिसून आली. मंगळवारी ०.९७ टक्क्यांची वाढ दर्शवीत हा निर्देशांक ७५२६.६५ वर स्थिरावला. ऑगस्ट महिन्यात रिझव्‍‌र्ह बँक आपले तिमाही पतधोरण जाहीर करणार आहे. महागाई निर्देशांकात झालेली घसरण लक्षात घेता या पतधोरणात व्याजाच्या दरांमध्ये कपात केली जाऊ शकते, अशी शक्यता काही ब्रोकर्सनी वर्तवली.
महागाईचा किरकोळ विक्री निर्देशांक ७.३१ टक्के झाला आहे. जानेवारी २०१२ पासून सलग ३० महिन्यांतील हा नीचांक आहे. त्या तुलनेत घाऊक किंमत निर्देशांक ५.४३ वर असून भाजीपाल्याच्या किमती हे याचे प्रमुख कारण मानले जात आहे. मंगळवारी रिअल्टी, बँकिंग आणि ऑटोमोबाइल या क्षेत्रांमध्ये खरेदीदारांनी बराच रस दाखवला. येत्या ५ ऑगस्ट रोजी रिझव्‍‌र्ह बँक तिमाही पतधोरण जाहीर करणार असून त्याकडे आता शेअर खेरदीदारांचे लक्ष लागले आहे.

आशियाई बाजारात सुधारणा
अमेरिकेच्या भांडवली बाजारात सकारात्मक वातावरण व खरेदी करणाऱ्यांचा उत्साह दिसून आला. त्यामुळे चीन, हाँगकाँग, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि तैवान या सर्वच देशांमधील निर्देशांकही ०.०१ ते ०.९४ टक्क्यांनी वधारले. त्यामुळे आशियाई देशांच्या भांडवली बाजारातही तेजीचे वातावरण होते. युरोपीय बाजारातही गुंतवणूकदारांचा सकारात्मक प्रतिसाद होता.

रुपयाची घसरण कायम
शेअर बाजाराने उसळी घेतल्यानंतरही डॉलरला असलेली मागणी कायम राहिल्याने रुपयाची घसरण सलग दुसऱ्या दिवशीही कायम राहिली. मंगळवारी सकाळी रुपयाचे अवमूल्यन होत ६०.११ प्रतिडॉलरवरून ६०.२४ प्रतिडॉलपर्यंत त्याची घसरण झाली. मात्र डॉलरची विक्री आणि स्थानिक बाजारातील स्थिरता यांचा रुपयाला फायदा झाला आणि प्रतिडॉलर त्याचे मूल्य ६०.०७ इतके झाले. दिवसअखेरीस रुपया ०.०८ टक्क्यांची घसरण नोंदवीत ६०.१२ वर स्थिरावला. सोमवारी रुपयाची १४ पैशांनी, तर मंगळवारी ५ पैशांनी घसरण झाली. आगामी काळात प्रतिडॉलर रुपयाचा दर ५९.६० ते ६०.६० च्या दरम्यान राहील, असे भाकीत काही तज्ज्ञांनी वर्तवले. रिझव्‍‌र्ह बँकेने प्रतिडॉलर रुपयांचे मूल्य ६०.२१९५ इतके तर प्रतिपौंड १०३.१६ इतके निश्चित केले. १०० जपानी येनमागे रुपयाचा दर ५९.१८ राहिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2014 3:16 am

Web Title: sensex gains 221 points
Next Stories
1 स्टेट बँकेच्या ठेवींवरील व्याज अध्र्या टक्क्याने कमी
2 पायाभूत रोख्यांबाबतची नियमावली शिथील
3 नव्या कररचनेचा म्युच्युअल फंडाना फटका
Just Now!
X