रिझव्‍‌र्ह बँकेने व्याजाच्या दरात कोणतेही बदल केले नसले तरी भविष्यात कपातीच्या शक्यतेला वाव देणाऱ्या राखलेल्या धोरणातील लवचिकतेचे गुरुवारी भांडवली बाजाराने स्वागत केले. उद्योग क्षेत्र आणि व्यक्तिगत कर्जाच्या एकवार पुनर्रचनेला बँकांना दिली गेलेली परवानगीही बाजारासाठी सुखकारक ठरली.

गुरुवारचे व्यवहार आटोपताना सेन्सेक्सने बुधवारच्या तुलनेत ३६२.१२ अंशांची भर घालत ३८,०२५.४५ ही पातळी गाठली. दिवसाच्या व्यवहारात एकेसमयी सेन्सेक्सने ५५८ अंशांची झेप घेतली होती. बरोबरीने राष्ट्रीय शेअर बाजाराच्य निफ्टी निर्देशांकाने ९८.५० अंशांची कमाई करीत दिवसाअखेरीस ११,२००.१५ या पातळीवर विश्राम घेतला. बाजार बंद होताना दोन्ही निर्देशांकांनी जवळपास एका टक्क्य़ाची वाढ साधली. महागाई दरासंबंधी अनिश्चितता, अत्यंत कमकुवत बनलेल्या अर्थव्यवस्थेच्या वाढीलाही अस्थिरतेचा पैलू पाहता तूर्त दरकपातीला विराम देण्याचा निर्णय रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण निर्धारण समितीने घेतला. तथापि भविष्यात महागाईत स्थायी स्वरूपाचा उतार दिसल्यास, अर्थवृद्धीला पूरक व्याजदर कपात केली जाऊ शकेल, अशा धोरणात्मक लवचिकतेला गुंतवणूकदारांनी चांगला संकेत, त्याचे स्वागत निर्देशांक वाढीतून दर्शविल्याचे जाणकारांनी सांगितले.