निर्देशांकांची जागतिक बाजारांना साथ; ‘ब्रेग्झिटआपटीनंतरची मोठी घसरण

  • एकाच सत्रात सेन्सेक्सची ४४४ अंशांची आपटी
  • मुंबई निर्देशांक पंधरवडय़ाच्या तळात
  • दीडशे अंश नुकसानाने निफ्टी ,७०० वर

अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हच्या संभाव्य व्याजदर वाढीने सोमवारी जगभरातील प्रमुख निर्देशांकांना घसरणीच्या कवेत घेतले. परिणामी सेन्सेक्स, निफ्टीसारख्या स्थानिक निर्देशांकांनीही त्याला साथ देत सप्ताहारंभी मोठी आपटी नोंदविली. येथील निर्देशांकांची एकाच व्यवहारातील १.५० टक्क्य़ांहून अधिकची आपटी ही ब्रेग्झिट आपटीनंतरची सर्वात मोठी ठरली.

४४३.७१ अंश घसरणीमुळे सेन्सेक्स सोमवारी २८,३५३.५४ पर्यंत तर १५१.१० अंश आपटीने ८,७१५.६० पर्यंत घसरला. प्रमुख निर्देशांकांची ही २४ जूननंतरची सत्रातील मोठी आपटी होती. युरोपमधून बाहेर पडण्याच्या ब्रिटनच्या मतदानदिनी सेन्सेक्स ६०४.५१ अंशांनी घसरला होता. नवसप्ताहारंभी मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांक तब्बल ३ टक्क्य़ांपर्यंत घसरले. सेन्सेक्स व निफ्टी आता गेल्या पंधरवडय़ाच्या तळात विसावला आहे.

सोमवारी सायंकाळी देशाच्या जुलैमधील औद्योगिक उत्पादन दर व ऑगस्टमधील ग्राहक किंमत निर्देशांक जाहीर होण्याच्या स्थितीत असतानाच तत्पूर्वीच्या व्यवहारात मुंबई व राष्ट्रीय शेअर बाजार जागतिक बाजारांनुसार प्रवास करता झाला. फेडरल रिझव्‍‌र्हमुळे भारतीय रिझव्‍‌र्ह बँकही येत्या महिन्यातील पतधोरणात दरवाढ करेल, ही भीती येथील गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाली.

आशियातील चीन, हाँग काँग, जपान, दक्षिण कोरिया, तैवान येथील प्रमुख निर्देशांकांमध्ये १.१८ ते ३.३६ टक्क्य़ांपर्यंत घसरण झाली. तर युरोपातील फ्रान्स, जर्मनी, ब्रिटनचे भांडवली बाजार २ टक्क्य़ांपर्यंतची सुरुवातीची घसरण नोंदवित होते. यामुळे येथील बाजारतही गुंतवणूकदारांमध्ये समभाग विक्रीकडे अधिक कल राहिला.

सेन्सेक्सचा नव्या आठवडय़ातील पहिल्या दिवसाचा प्रवास २८,४८१.०९ ने सुरू होत सत्रातील २८,२५१.३१ पर्यंतच्या तळात आला. दिवसअखेर त्यात शुक्रवारच्या तुलनेत ४४३.७१ पर्यंत घसरण झाली.

मुंबई शेअर बाजारात ही पडझड नोंदली गेली असली तरी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रीय निर्देशांक मात्र एक टक्क्य़ापर्यंतच्या वाढीची कामगिरी बजाविणारा ठरला. यामुळे या निर्देशांकातील टीसीएस, विप्रो, इन्फोसिससारख्या कंपन्यांच्या समभागांचे मूल्यही वाढले. डॉलर भक्कम होत असल्याने हे समभाग खरेदीच्या चर्चेत राहिले. माहिती तंत्रज्ञान कंपन्यासह रिलायन्स इंडस्ट्रीजही तेजीच्या यादीत राहिला.

सेन्सेक्समध्ये घसरलेल्या २६ समभागांमध्ये अदानी पोर्ट्स, स्टेट बँक, लार्सन अँड टुब्रो, एनटीपीसी, अ‍ॅक्सिस बँक, टाटा मोटर्स, महिंद्र अँड महिंद्र, हीरो मोटोकॉर्प, बजाज ऑटो, आयटीसी, गेल यांचा समावेश राहिला.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ५.२३ टक्क्य़ांसह स्थावर मालमत्ता घसरणीत आघाडीवर राहिला. तर पोलाद, भांडवली वस्तू, ऊर्जा, वाहन आदी निर्देशांक ४.३४ टक्क्य़ांपर्यंत घसरले.

भांडवली बाजार मंगळवारी ईदनिमित्त बंद आहेत.

अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझव्‍‌र्हची येत्या आठवडय़ात, २० व २१ सप्टेंबर रोजी व्याजदर निश्चितीबाबत बैठक होत आहे.

अमेरिकेतील रोजगारविषयक चित्र सकारात्मक स्पष्ट झाल्याने डिसेंबर २०१६ पासून व्याजदर वाढ केली जाऊ शकते, असा अंदाज आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यक्त केला जात आहे.

सुमार तिमाही नफ्याने समभागांवर परिणाम;  टाटा स्टील, जेपी गाळात

सेन्सेक्समध्ये घसरलेल्या समभागांमध्ये ५.३० टक्क्य़ांसह टाटा स्टील सर्वात वर राहिला. जूनअखेरच्या तिमाहीत तोटय़ातील दहापटीची नोंद करणाऱ्या (३,१८३.०७ कोटी रुपये) घटनेचे सावट समभागवर पडले. यामुळे एकाच दिवसात कंपनीचे बाजारमूल्य २,०२९ कोटी रुपयांनी खाली आले. त्याचबरोबर स्थावर मालमत्ता क्षेत्रातील जेपी इन्फ्राटेक व जेपी असोसिएट्सच्या समभाग मूल्यात ७ टक्क्य़ांपर्यंतची आपटी नोंदली गेली. दोन्ही कंपन्यांनी एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीतील तोटा सोमवारी घोषित केला.