जागतिक प्रतिकूलतेने भयकंप..

भांडवली बाजाराच्या निर्देशांकाचा डोलारा गुरुवारच्या व्यवहारात पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. चीनच्या घसरलेल्या निर्यातीची आकडेवारी, अमेरिकेच्या निवडणुकीच्या कौलाबाबत संभ्रमता, फेडच्या व्याजदर वाढीची वाढलेली शक्यता या घडामोडींमुळे जगभरात सर्वत्रच विक्रीला चढलेल्या जोराचे स्थानिक बाजारावरही नकारात्मक सावट निर्माण केले. त्यातच पी-नोट्समार्फत होणाऱ्या गुंतवणुकीला पायबंदाच्या संकेतांतून निर्माण झालेल्या धास्तीने बाजारातील घसरणीला सर्वव्यापी रूप दिले. परिणामी, मुख्य निर्देशांक सेन्सेक्स ४३९ अंशांनी घसरून २७,६४३.११ या तीन महिन्यांपूर्वीच्या पातळीवर फेकला गेला.

दसरा आणि मोहरम अशा सलग दोन दिवस चालून आलेल्या सुट्टय़ानंतर, बाजाराने गुरुवारी उणे स्थितीपासूनच सुरुवात केली. त्यातच गुरुवारचे व्यवहार आटोपल्यानंतर जाहीर होणाऱ्या दोन घटनांबाबतही बाजाराने सावध पवित्रा घेतलेला दिसला. किरकोळ किमतीवर आधारित महागाई निर्देशांकातील घसरणीचा कल कायम राहील काय, तसेच माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी टीसीएसच्या दुसऱ्या तिमाहीतील वित्तीय कामगिरीबाबत साशंकतेने गुंतवणूकदारांना चिंतेने घेरल्याचे आढळून आले. एकूण नकारात्मक भावना प्रबळ बनल्याने बँका, वित्तीय सेवा, दूरसंचार, स्थावर मालमत्ता यासह अलीकडच्या दिवसांत उभारी दाखविणाऱ्या वाहन व धातू उद्योगांतील समभागांमध्ये विक्रीचा सपाटा सुरू झाला. भाव वरच्या स्तरावर असताना नफा पदरात पाडून घेण्याची बडय़ा गुंतवणूकदारांच्या चालीचा परिणाम म्हणून निर्देशांकाच्या घसरगुंडीत झालेला दिसून आला.

सेन्सेक्स निर्धारित करणाऱ्या ३०पैकी २४ समभाग घसरणीत राहिले. घसरणीचे रूप व्यापक होते आणि त्यात सर्वच क्षेत्रनिहाय निर्देशांक घरंगळले. बीएसई मिड कॅप निर्देशांक १.५० टक्के, तर स्मॉल कॅप निर्देशांक १.४१ टक्के असे घसरले.

जागतिक स्तरावर हाँगकाँग, जपान, सिंगापूर या मुख्य आशियाई बाजारांच्या निर्देशांकातही दीड ते पावणे दोन टक्क्यांची घसरण दिसून आली. मध्यान्हीला सुरू झालेल्या युरोपीय बाजारात फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटिश बाजारांच्या निर्देशांकांमध्ये एक ते सव्वा टक्क्यांच्या घसरणीनेच दिवसाचे व्यवहार खुले झाले.

मूल्यांकनात दुरुस्ती स्वागतार्ह

कंपन्यांच्या तिमाही कामगिरीत फारसा सुधार नसताना, बाजाराची सद्यपातळी ही खूपच ताणलेल्या स्थितीत होती. त्यामुळे वरच्या पातळीवर भाव असताना नफा पदरात पाडून घेण्याचा डाव बडय़ा गुंतवणूकदारांकडून खेळला जाणे अपरिहार्यच होते. बाजाराला तांत्रिकदृष्टय़ा वास्तविक मूल्यांकनावर आणणारी  घसरण आवश्यकच होती, असेही बाजार विश्लेषकांचे मत आहे.  निर्देशांकांच्या पातळीत एकंदर ५-१० टक्क्यांच्या सुधारणेची तयारी गुंतवणूकदारांनी ठेवावी. अन्यथा निफ्टी ५० निर्देशांकांचे ८५६० ते ८७५० या मर्यादित आवर्तनांत हेलकावे काही काळ सुरू राहणे अपरिहार्य आहे, असा आनंद राठी फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे तांत्रिक विश्लेषक चंदन तपारिया यांचा कयास आहे.

बाजाराला धास्तावणाऱ्या   बाह्य़ घडामोडी

  • युरोपीय बँकांचा आजार

बलाढय़ डॉइशे बँकेने केलेल्या गफलतीच्या पुढे येत असलेल्या वार्तामुळे संबंध युरोपीय बँकांना आजाराने वेढले असल्याचे चित्र निर्माण केले आहे. संबंध युरोपीय खंडाला वेढणारे हे बँकिंग अरिष्ट असे टोक गाठणाऱ्या या घडामोडी असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

  • अमेरिकी निवडणुकीचा कौल

अमेरिकेत सध्या सुरू असलेल्या अध्यक्षीय निवडणुकाचे वारे रिपब्लिकन ते डेमोक्रॅटिक पक्ष या दोन पक्षांदरम्यान फिरते आहे, तसे जागतिक बाजार हेलकावे घेताना दिसत आहे. मुख्यत: डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदी निवडून आल्यास अमेरिकेचे अनेक देशांबरोबर असलेले मुक्त व्यापार करार संपुष्टात आणण्याच्या केलेल्या घोषणेवर बाजारात नाखुशीचे पडसाद आहेत.

  • फेडच्या दरवाढीचे संकट

जगावर आर्थिक मंदीची छाया असताना, अमेरिकी अर्थव्यवस्था मात्र निरंतर उभारीचे संकेत देत आहे.  अर्थचक्र गतिमान होत आहे आणि मुख्यत: ब्ेरोजगारीचे प्रमाण घटत असताना, तेथील मध्यवर्ती बँक – फेडरल रिझव्‍‌र्हला व्याजदर वाढीला लवकरच मुहूर्त सापडेल, असे म्हटले जात आहे.

  • चीनच्या निर्यातीत घसरण

जगातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनच्या सप्टेंबरमधील निर्यातीत १० टक्क्यांच्या घसरणीने या अर्थसत्तेच्या स्थिरतेबाबत शंकेला आणखी जागा निर्माण केली आहे. चीनच्या आयातीतही निरंतर घसरण सुरू आहे. जगातील धातूच्या सर्वात मोठय़ा आयातदार देशातील सद्य:स्थितीने धातू व खाणकाम क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांवर नकारात्मक परिणाम साधला.

सलग आलेल्या सुट्टय़ांमुळे आधीच आळसावलेल्या बाजारात, जागतिक प्रतिकूलतेचा घटक हा विक्रीचा मारा तीव्र करणारा ठरला. त्याचप्रमाणे सोमवारी जाहीर झालेल्या निराशाजनक औद्योगिक उत्पादन निर्देशांकाची कामगिरी पाहता, सायंकाळी जाहीर होणाऱ्या किरकोळ महागाई दराच्या आकडेवारीही स्थानिक स्तरावर प्रतिकूलतेत भर घालेल काय, ही बाब गुंतवणूकदारांना साशंक बनविणारी ठरली.

विनोद नायर, संशोधन प्रमुख जिओजित बीएनपी परिबा