News Flash

बाजारावर दबाव; निर्देशांकात घसरण

सेन्सेक्समधील ३० पैकी १७ कंपन्यांच्या समभागांचे मूल्य मंगळवारी घसरले.

संग्रहित छायाचित्र

टाटा उद्योग समूहातील घडामोडींचा

टाटा समूहातील धक्कादायक नेतृत्वबदलाचे सावट मंगळवारी भांडवली बाजारात उमटलेच. समूहातील अनेक सूचिबद्ध कंपन्यांसह सेन्सेक्समधील प्रमुख समभागांचे मूल्य रोडावले. परिणामी ८७.६६ अंश घसरणीसह मुंबई निर्देशांकाने त्याचा २८,१००चा स्तर सोडताना २८,०९१.४२ पर्यंत खाली आला. तर १७.६५ अंश घसरणीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही त्याचा ८,७०० हा उल्लेखनीय टप्पा सोडून ८,६९१.३० वर स्थिरावला.

सोमवारी भांडवली बाजारातील व्यवहार संपुष्टात आल्यानंतर टाटा समूहामार्फत अध्यक्ष सायरस मिस्त्री यांना काढून टाकल्याचे जाहीर करण्यात आले. त्याचा अपेक्षित परिणाम समूहातील कंपन्यांच्या समभागांवर मंगळवारचे व्यवहार सुरू होताच जाणवू लागला. कारवाईवरून टाटा आणि मिस्त्री यांच्या दरम्यान आता कायदेशीर लढाई सुरू होण्याची धास्ती समभागांना दिवसअखेर अधिक मूल्यऱ्हासाकडे घेऊन गेली.

नव्या सप्ताहाची सुरुवात करताना सेन्सेक्सने सोमवारी शतकी निर्देशांक वाढ नोंदविली होती. टाटा समूहातील कंपन्यांच्या समभागां व्यतिरिक्त सेन्सेक्समधील महिंद्र अँड महिंद्र, गेल, हिंदुस्थान यूनिलिव्हर, ओएनजीसी, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, आयटीसीचे मूल्य २.७२ टक्क्यांपर्यंत घसरले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये माहिती तंत्रज्ञान, भांडवली वस्तू, तेल व वायू आदी एक टक्क्यापर्यंत घसरले.

सेन्सेक्समधील ३० पैकी १७ कंपन्यांच्या समभागांचे मूल्य मंगळवारी घसरले. मुंबई शेअर बाजारातील स्मॉल कॅप ०.१३ टक्क्याने वाढला; तर मिड कॅप ०.३० टक्क्याने घसरला.

आशियातील प्रमुख निर्देशांकांमध्ये संमिश्र वातावरण होते. तर युरोपातील भांडवली बाजारांमध्ये सुरुवातीची तेजी नोंदली गेली.

गुरुवारी बाजारात महिन्यातील वायदापूर्तीचे अखेरचे व्यवहार होणार आहेत. तर नव्या संवत्सराचे मुहूर्ताचे सौदे येत्या रविवारी, ३० ऑक्टोबर रोजी होणार आहेत.

टाटा कंपन्यांचे बाजारमूल्य १०,००० कोटींनी घसरले!

टाटा समूहातून अध्यक्ष म्हणून सायरस मिस्त्री बाहेर गेल्यानंतर मंगळवारच्या व्यवहारअखेर समूहातील सूचिबद्ध कंपन्यांचे समभाग ३ टक्क्यांपर्यंत घसरले. यामुळे या कंपन्यांचे बाजारमूल्य एकाच दिवसाच्या व्यवहारात १०,७०० कोटी रुपयांनी खाली आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2016 3:21 am

Web Title: sensex goes down 7
Next Stories
1 अनेक उद्योग क्षेत्रांसाठी भरभराटीची यंदाची दिवाळी
2 विदेशातील मालमत्ता तपशिलासाठी मल्यांना महिन्याभराची मुदत
3 शेअर बाजारात टाटा समुहातील कंपन्यांच्या समभागांची घसरगुंडी
Just Now!
X