• सप्ताहारंभी आपटी सुरूच; सहाव्या सत्रातही घसरण
  • ६८ खोलातील रुपयाची धास्ती कायम

सलग सहाव्या सत्रात घसरण नोंदविताना प्रमुख निर्देशांकांनी नव्या सप्ताहाचा प्रारंभदेखील नकारात्मक वाटचालीने केला. असे करताना मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २६ हजार तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८ हजाराखाली आला. एकाच सत्रात जवळपास दोन टक्क्य़ांच्या निर्देशांक आपटीने प्रमुख भांडवली बाजार हे त्यांच्या गेल्या सहा महिन्यांच्या तळात नव्याने विसावले.

३८५.१० अंश घसरणीसह सेन्सेक्स २५,७६५.१४ वर थांबला. तर १४५ अंश आपटीने निफ्टी ७,९२९.१० पर्यंत स्थिरावला. दोन्ही निर्देशांकांनी २५ मेनंतरची किमान पातळी सोमवारी गाठली. तर टक्केवारीतील त्यातील घसरण १.४७२ ते १.८० टक्के राहिली.

मुंबई शेअर बाजाराची नव्या सप्ताहातील व्यवहाराची सुरुवात सकाळच्या सत्रात २६,२४६.७० अशा काहीशा तेजीने झाली. सत्रात तो २६,२७०.२८ पर्यंत उंचावलादेखील. मात्र बाजारात विक्रीचा दबाव निर्माण होत सेन्सेक्सने व्यवहारात २६ हजाराचा टप्पा सोडत २५,७१७.९३ असा स्तर अनुभवला. दिवसअखेर तो गेल्या सप्ताहाच्या तुलनेत तब्बल ४०० अंशांनी खाली आला. डॉलरच्या तुलनेत ६८ पर्यंत घसरलेल्या रुपयाचीही बाजारातील धास्ती कायम आहे.

भारतातील निश्चलनीकरण आणि अमेरिकी फेडरल बँकेचे पतधोरण अशा वातावरणात गेल्या सलग सहा व्यवहारात सेन्सेक्समध्ये १,७५२.५४ अंश घसरण झाली आहे. टक्केवारीत हे प्रमाण ६.३७ आहे.

मुंबई शेअर बाजारात स्थावर मालमत्ता, पोलाद, वाहन, सार्वजनिक उपक्रम, वित्त, भांडवली वस्तू, ग्राहकपयोगी वस्तू, ऊर्जा, तेल व वायू, माहिती तंत्रज्ञान आदी अनेक क्षेत्रीय निर्देशांक घसरले होते. ४.७१ टक्के अशा सर्वाधिक प्रमाणात स्थावर मालमत्ता निर्देशांक खाली आला. तर मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांकही घसरणीचा क्रम राखून होते.

मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्समधील केवळ पाच समभागांचे मूल्य एकूण पडझडीच्या निर्देशांकातही वाढले. विप्रो, टीसीएस, सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज हे ते समभाग होते. तर घसरलेल्या २५ समभागांमध्ये स्टेट बँक, पॉवर ग्रिड, टाटा स्टील, मारुती सुझुकी, महिंद्र अँड महिंद्र, टाटा मोटर्स, डॉ. रेड्डीज्, एनटीपीसी, अदानी पोर्ट्स, एचडीएफसी, कोल इंडिया, गेल इंडिया, अ‍ॅक्सिस बँक, आयटीसी, एल अँड टी, बजाज ऑटो यांचे मूल्य सर्वाधिक घसरले.