सेन्सेक्स सहा महिन्यांच्या तळातून वर

गेल्या सलग सहा व्यवहारांपासून सुरू असलेल्या भांडवली बाजाराच्या पडझडीला अखेर मंगळवारी पायबंद बसला. १९५.६४ अंश वाढीने सेन्सेक्स २६ हजाराच्या काठावर- २५,९६०.७८वर पोहोचला.

७३.२० अंश वाढीसह राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीला आठ हजारांवरील स्तर पुन्हा गाठता आला. हा निर्देशांक ८,००२.३० वर स्थिरावला.

गेल्या सलग सहा व्यवहारांत सेन्सेक्स १,७५२.५४ अंशांनी खाली आला होता. परिणामी मुंबई निर्देशांक गेल्या सहा महिन्यांच्या तळात पोहोचला होता.

महिन्यातील वायदापूर्तीच्या व्यवहारांची वेळ नजीक येत असताना गुंतवणूकदारांनी मंगळवारी खरेदीला प्राधान्य दिले. पोलाद, स्थावर मालमत्ता, ऊर्जा क्षेत्रातील समभागांना त्यांनी या वेळी प्रतिसाद दिला. सेन्सेक्सचा सत्रातील प्रवास २६,०३९.७० पर्यंत पोहोचला. मात्र दिवसअखेर सोमवारच्या तुलनेतील वाढ त्याला २६ हजारांवर राखू शकली नाही.

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरात पुन्हा वाढ दिसू लागल्याने तसेच अमेरिकी डॉलर हे चलन अधिक भक्कम होऊ लागल्याने जागतिक महासत्तेतील प्रमुख निर्देशांक विक्रमी टप्प्यावर पोहोचले आहेत. प्रमुख तेल उत्पादक देशांची येत्या ३० नोव्हेंबर रोजी बैठक होत असताना खनिज तेल दर आता महिन्याच्या उच्चांकावर पोहोचले आहेत. भारतात निश्चलनीकरणानंतर स्थिती सावरण्यासाठी सरकारच्या उपाययोजनाही येथील बाजाराच्या पथ्यावर पडल्या. भांडवली बाजारात येत्या गुरुवारी महिन्यातील वायदापूर्तीचे व्यवहार होणार आहेत.

सेन्सेक्समधील ३० पैकी २३ समभागांचे मूल्य वाढले. तर सात समभाग हे घसरणीच्या यादीत राहिले. मारुती सुझुकी, बजाज ऑटो, हिंदुस्थान युनिलिव्हर, हीरो मोटोकॉर्प, अदानी पोर्ट्स, विप्रो, एचडीएफसी, टाटा मोटर्स, भारती एअरटेल, महिंद्र अँड महिंद्र, अ‍ॅक्सिस बँक, ल्युपिन, रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग मूल्य २.५४ टक्क्यांपर्यंत वाढले. तर लार्सन अँड टुब्रो, गेल इंडिया, एनटीपीसी, पॉवर ग्रिड, डॉ. रेड्डीज् १.४१ टक्क्यांपर्यंत घसरले. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांक अनुक्रमे १.३९ व १.१६ टक्क्यांनी वाढले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये पोलाद, स्थावर मालमत्ता, वाहन, ऊर्जा, वित्त, तेल व वायू निर्देशांक २.७४ टक्क्यांपर्यंत वाढले.

आशियाई बाजारात चीन, हाँग काँग, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया, तैवान येथील प्रमुख निर्देशांकांमध्येही एक टक्क्यापर्यंत वाढ नोंदली गेली. तर युरोपीय भांडवली बाजारांची सुरुवात सकारात्मक झाली.