डिसेंबरमधील वायदा व्यवहार मालिकेच्या पहिल्या दिवशी गुंतवणूकदारांकडून खरेदीचा जोर राहिल्याने भांडवली बाजारात शुक्रवारी गेल्या सहा महिन्यांतील सर्वोत्तम सत्र निर्देशांक वाढ या रूपात नोंदली गेली. सप्ताहअखेरच्या एकाच व्यवहारात तब्बल ४५६.१७ अंश वाढीसह सेन्सेक्सला त्याचा २६ हजारांचा टप्पा पुन्हा गाठता आला. मुंबई निर्देशांक २६,३१६.३४ वर पोहोचला. तर १४८.८० अंश वाढीमुळे निफ्टी ८,११४.३० पर्यंत स्थिरावला.

सेन्सेक्सची शुक्रवारची सत्रझेप ही १८ ऑक्टोबर रोजीच्या ५२०.९१ अंश वाढीनंतरची सर्वोत्तम ठरली. दोन्ही प्रमुख निर्देशांक १.८७ टक्क्यांपर्यंत विस्तारले. तर सप्ताह तुलनेत सेन्सेक्स व निफ्टीतील वाढ अनुक्रमे १६६.१० व ४०.२० अंश राहिली.

गुरुवारी अमेरिकी चलन गेल्या १४ वर्षांच्या उच्चांकावर भक्कम झाल्याने भांडवली बाजारात माहिती तंत्रज्ञान, औषधनिर्माण क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग मूल्य उंचावले. गुरुवारच्या व्यवहारात रुपया ६९ च्या तळात पोहोचताना ऐतिहासिक नीचांकावर येऊन ठेपला होता.

सेन्सेक्सची सप्ताहअखेरच्या व्यवहाराची सुरुवात २५,९५३.२४ या वरच्या टप्प्यावर झाली. सत्रात मुंबई निर्देशांक २६ हजारावर जाताना २६,३४३.९५ पर्यंत झेपावला. गुरुवारच्या तुलनेत त्याची वाढ १.७६ टक्क्याची राहिली. तर निफ्टीला त्याचा ८,१०० वरील टप्पा आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी जवळपास दीडशे अंश वाढीमुळे गाठता आला.

निश्चलनीकरणामुळे देशाच्या विकास दराचे घसरते आकडे अंदाजले जात असतानाच चीनपेक्षा भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाचे प्रमाण अधिक राहील, या फिच मानांकन संस्थेच्या निष्कर्षांने बाजाराला अधिक दिलासा मिळाला.

मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप १.३० टक्के, तर स्मॉल कॅप निर्देशांक २ टक्क्यांची भर नोंदविता झाला. सेन्सेक्समधील बजाज ऑटो, स्टेट बँक व भारती एअरटेल या केवळ ३ समभागांचे मूल्य घसरणीच्या यादीत राहिले. इतर सर्व २७ समभाग वाढले. त्यात गेल, एचडीएफसी, एनटीपीसी, अदानी पोर्ट्स, टाटा स्टील, आयटीसी, डॉ. रेड्डीज्, एचडीएफसी बँक आदींचा समावेश होता.

माहिती-तंत्रज्ञान, औषधी समभागांची आगेकूच

वधारलेल्या माहिती तंत्रज्ञान व औषधनिर्मिती निर्देशांकांमध्ये टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, सन फार्मा, ऑरबिंदो फार्मा, ल्युपिन, सिप्ला आदी समभाग राहिले. त्यांचे मूल्य ५.२३ टक्क्यांपर्यंत वाढले. माहिती तंत्रज्ञान आरोग्यनिगा निर्देशांकातील वाढ अनुक्रमे ४.६९ टक्के व २.३५ टक्के राहिली. त्याचबरोबर ग्राहकोपयोगी वस्तू, ऊर्जा, पोलाद आदी निर्देशांकही वाढले.

[jwplayer DfBlas1q-1o30kmL6]