प्रमुख निर्देशांकांमध्ये किरकोळ वाढ

सलग दुसऱ्या दिवशी निर्देशांक वाढ नोंदविताना भांडवली बाजारांनी नव्या सप्ताहाची सुरुवात तेजीसह केली. ३३.८३ अंश वाढीसह सेन्सेक्स २६,३५०.१७ वर तर १२.६० अंश भर नोंदवित निफ्टी ८,१२६.९० वर पोहोचला.

रिझव्‍‌र्ह बँकेने सीआरआर प्रमाण तब्बल एक टक्क्य़ाने वाढविल्यानंतर बँकांकडील निधी अतिरिक्त उपलब्ध होणार असल्याचे भांडवली बाजारात मात्र फार स्वागत झाले नाही. तर दूरसंचार, ऊर्जा, स्थावर मालमत्त, वाहन क्षेत्रातील समभागांना मागणी राहिली. बँकांबरोबरच माहिती तंत्रज्ञान, ग्राहकपयोगी वस्तू, वित्त क्षेत्रावरही विक्री दबाव उमटला.

नव्या सप्ताहाची सुरुवात २६,३०३.५२ अशी किमान स्तरावर करणारा सेन्सेक्स सत्रात २६,१८३.२२ पर्यंत खालीदेखील आला होता. मात्र उत्तरार्धात त्यात वाढ नोंदली गेली. व्यवहारात २६,४१३.९९ पर्यंत मजल मारल्यानंतर दिवसअखेर तो शुक्रवारच्या तुलनेत काहीसा वाढला. तर ८,०६६.५० ते ८,१४६.५० दरम्यान प्रवास करणाऱ्या राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीचा प्रवास दिवसअखेर काही प्रमाणात वाढत ८,१०० पुढे राहिला.

sensex-chart

मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांक अनुक्रमे ०.९७ व ०.६६ टक्क्य़ाने वाढले. सेन्सेक्समध्ये १७ समभागांचे मूल्य वाढले. त्यात भारती एअरटेल, अदानी पोर्ट्स, आयटीसी, ओएनजीसी, हीरो मोटोकॉर्प, एनटीपीसी, पॉवर ग्रिड, सिप्ला, बजाज ऑटो, हिंदुस्थान यूनिलिव्हर यांचा ५.५३ टक्के वाढीपर्यंतच्या समभागांचा समावेश राहिला. तर स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, विप्रो, लार्सन अँड टुब्रो, महिंद्र अँड महिंद्र, एशियन पेंट्स, रिलायन्स आदी घसरलेल्या समभागांमध्ये गणले गेले.

रुपया आणखी कमकुवत

भारतीय चलनाचा प्रवास पुन्हा एकदा ६९ च्या दिशेने सुरू झाला. आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी परकी चलन मंचावर रुपया डॉलरच्या तुलनेत ३० पैशांनी कमकुवत होत ६८.७६ पर्यंत घसरला. रुपयाची ही २०१६ मधील आतापर्यंतचा सर्वात कमी स्तरावरील नोंद होती. भांडवली बाजारातून विदेशी गुंतवणूकदारांचा निधी काढून घेण्याची भीती या मंचावर व्यक्त झाली. १ जानेवारी २०१६ पासून रुपया आतापर्यंत डॉलरच्या तुलनेत ३.९५ टक्क्य़ांनी घसरला आहे. रुपयाने गेल्या आठवडय़ात गुरुवारी ६८.८६ हा त्याचा ऐतिहासिक तळ नोंदविला होता. यापूर्वीच्या त्याचा नीचांक ६८.७४ हा तब्बल तीन वर्षांपूर्वी होता.

सोने, चांदीत मूल्य वाढ

भांडवली तसेच परकी चलन बाजारात घसरण नोंदली जात असताना शहरातील सराफा बाजारात मौल्यवान धातूंचे दर पुन्हा एकदा चकाकू लागले आहेत. मुंबईत स्टॅण्डर्ड सोन्याचां तोळ्याचा भाव एकाच सत्रात १४५ रुपयांनी वाढून २९ हजार रुपयांवर गेला. तर शुद्ध सोने याच प्रमाणात, याच वजनासाठी उंचावत २९ हजाराच्या वर, २९,१५० रुपयांवर गेले. चांदीच्या दरातील मूल्य उसळी ७६५ रुपये होती. पांढरा धातू सत्रअखेर ४२,०३० रुपयांवर स्थिरावला.