28 February 2021

News Flash

नव वित्त वर्ष शुभारंभ: सेन्सेक्स, निफ्टीचा उच्चांक

आठवडय़ातील पहिल्या सत्रातील त्याचा प्रवास ९,१९२.४० ते ९,२४५.३५ असा वरच्या स्तरावरील राहिला.

सेन्सेक्स

भांडवली बाजारांनी २०१७-१८ या नव्या वित्त वर्षांची सुरुवात तेजीसह करतानाच राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकाला नव्या उच्चांकी टप्प्यावर नेऊन ठेवले. निफ्टीने सोमवारी ६४.१० अंश वाढ नोंदवित ९,२३७.८५ हा सर्वोच्च टप्पा गाठला. आठवडय़ातील पहिल्या सत्रातील त्याचा प्रवास ९,१९२.४० ते ९,२४५.३५ असा वरच्या स्तरावरील राहिला.

१ एप्रिल २०१७ पासून सुरू झालेल्या नव्या वित्त वर्षांतील भांडवली बाजाराचा व्यवहाराचा सोमवारी पहिला दिवस होता. आघाडीच्या रिलायन्स, लार्सन अँड टुब्रोसारख्या कंपन्यांच्या समभागांना अर्थव्यवस्था सुधाराच्या अपेक्षेने गुंतवणूकदारांकडून मागणी राहिली. त्याचबरोबर भारतातील निर्मिती क्षेत्राची फेब्रुवारीमधील कामगिरी गेल्या पाच महिन्यांच्या उत्तम कसोटीवर उतरल्याचेही बाजारात स्वागत झाले.

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये सोमवारी २८९.७२ अंश वाढ झाल्याने निर्देशांक २९,९१०.२२ वर पोहोचला. निर्देशांकाने यापूर्वी २९ जानेवारी २०१५ रोजी २९,६८१.८८ हा स्तर अनुभवला होता. तर तर सोमवारच्या व्यवहारातील त्याची वाढ २९,७०५.७२ ते २९,९२६.९४ दरम्यान राहिली. दिवसअखेर सेन्सेक्सनेही ऐतिहासिक टप्पा गाठला आहे.

नव्या आठवडय़ाचे व नव्या आर्थिक वर्षांतील व्यवहारांची सुरुवात करताना मुंबई निर्देशांक सकाळच्या सत्रात २९,७३७.७३ या वरच्या टप्प्यावर राहिला. यानंतर त्याने व्यवहारात अखेपर्यंत गेल्या शुक्रवारच्या तुलनेत वाढच नोंदविली. तिकडे निफ्टी निर्देशांकातही असेच चित्र सत्रसंपेपर्यंत कायम राहिले. तर सेन्सेक्सची सोमवारची त्रिशतकी सत्रझेप ही १४ मार्च २०१७ नंतरची सर्वात मोठी ठरली.

रिलायन्स जिओच्या सवलत सेवेची मर्यादा विस्तारल्याचा परिणाम समूहाच्या बाजारातील सूचिबद्ध समभाग मूल्यावर ४ टक्के वाढीमध्ये झाला. तर अभियांत्रिकी सेवा क्षेत्रातील आघाडीचा समूह असलेल्या लार्सन अँड टुब्रोची समभाग मूल्यवाढ कामगिरी ही सेन्सेक्समधील सर्वोत्तम राहिली. अन्य समभागांमध्ये डॉ. रेड्डीज्, एशियन पेंट्स, टाटा मोटर्स, हिंदुस्थान यूनिलिव्हर, मारुती सुझुकी, अदानी पोर्ट्स, सन फार्मा यांचे मूल्य वाढले.

मुंबई शेअर बाजारातील स्मॉल कॅप १.२९ टक्के तर मिड कॅप निर्देशांक ०.६६ टक्क्य़ाने वाढले.

बँक समभागांना सोमवारी अधिक मागणी राहिली. यामध्ये आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक, एचडीएफसी यांचा क्रम राहिला. प्रमुख निर्देशांक वाढूनही इन्फोसिस, भारतीय एअरटेल, विप्रो, बजाज ऑटो, एनटीपीसी, टीसीए, ल्युपिन हे घसरणीच्या यादीत राहिले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ३.४७ टक्क्य़ांसह भांडवली वस्तू निर्देशांक आघाडीवर राहिला.

आशियातील प्रमुख निर्देशांकांमध्ये अध्र्या टक्क्य़ापर्यंतची वाढ झाली. तर युरोपीय बाजारांची सुरुवातही तेजीसह झाली.

भारतातील प्रमुख बाजार हे राम नवमीनिमित्त मंगळवारी बंद राहणार आहेत. बाजारात आता बुधवारी व्यवहार होतील. तसेच परकी चलन मंचावरही आता मंगळवारऐवजी बुधवारी व्यवहार होतील.

सत्रात रुपयाचा दीड वर्षांचा उच्चांक; व्यवहारअखेर मात्र माघार

परकी चलन विनिमय मंचावर रुपयाने सप्ताहारंभी गेल्या तब्बल १८ महिन्यांचा उच्चांकी स्तर गाठला. डॉलरच्या तुलनेत स्थानिक चलन सोमवार सत्रात ६४.७६ पर्यंत झेपावले होते. रुपयाने यापूर्वी २३ ऑक्टोबर २०१५ रोजी सर्वोच्च स्तर अनुभवला होता. मात्र दुपारच्या व्यवहारानंतर रुपया कमकुवत बनत गेल्या सप्ताहाखेरच्या तुलनेत १८ पैशांनी घसरून ६५.०३ वर स्थिरावला.

सोने-चांदी पुन्हा दरचकाकीकडे

सलग चार व्यवहारात घसरण नोंदविल्यानंतर सराफा बाजारात आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी पुन्हा एकदा दरतेजी नोंदली गेली. भांडवली तसेच परकी चलन मंचाप्रमाणे येथेही मोठय़ा प्रमाणात हालचाल नोंदली गेली. स्टॅण्डर्ड सोने तोळ्यासाठी सोमवारी ११० रुपयांनी उंचावत २८,७३५ रुपयांवर गेले. तर चांदीचा किलोचा दर २२५ रुपयांनी वाढून ४२,५९० रुपयांपर्यंत स्थिरावला. लंडनच्या प्रमुख बाजारात सोने तसेच चांदीच्या दरांमध्ये मात्र घसरण आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2017 2:09 am

Web Title: sensex goes up 20
Next Stories
1 स्वस्त कर्ज पर्व सुरू!
2 आठवडय़ाची मुलाखत : सौरऊर्जेद्वारे वीज देयकात घट शक्य
3 आता केवळ एक पानाचे ‘सहज’ प्राप्तिकर विवरणपत्र
Just Now!
X