सेन्सेक्स, निफ्टीची किरकोळ वाढीसह आठवडाअखेर
सप्ताहाची अखेर करताना प्रमुख निर्देशांकांनी शुक्रवारी किरकोळ वाढ नोंदविली. मात्र गेल्या तीन महिन्यातील पहिली सप्ताह घसरणीलाही बाजाराला सामोरे जावे लागले.
सेन्सेक्स शुक्रवारी ३.५२ अंश वाढीने २५,६०६.६२ वर पोहोचला. तर निफ्टी २.५५ अंश वाढीने ७,८४९.८० पर्यंत पोहोचू शकला. सप्ताहात सेन्सेक्सने २३१.५२ अंश तर निफ्टीने ४९.५० अंश घसरण नोंदविली आहे. शुक्रवारी बाजाराचा नव्या महिन्यातील वायदापूर्तीचा पहिला दिवस होता.
शुक्रवारच्या किरकोळ घसरणीमुळे सेन्सेक्स त्याच्या गेल्या पंधरवडय़ाच्या वरच्या टप्प्यापासूनही माघारी फिरला. आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या परिणामांची नोंद प्रमुख निर्देशांकांनी गुरुवारी मोठय़ा घसरणीसह केली होती. महिन्यातील वायदापूर्तीच्या अखेरच्या दिवशी सेन्सेक्स ४६१.०२ तर निफ्टी १३२.६५ अंशांनी कोसळला होता. विदेशातील प्रमुख मध्यवर्ती बँकांचे व्याजदराबाबतचे धोरण आणि आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा वाढत असलेले खनिज तेलाचे दर यांची चिंता येथे उमटत आहे.
सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी बाजार तेजी-घसरणीच्या हिंदूोळ्यावर राहिला. शुक्रवारी सार्वजनिक क्षेत्रातील अन्य कंपन्यांसह तेल व वायू, ऊर्जा, औषधनिर्माण क्षेत्रातील कंपन्यांना मागणी राहिली. सेन्सेक्समध्ये ल्युपिन, सिप्ला, एसीसी, अंबुजा सिमेंटच्या समभागांमध्ये वाढ झाली.
मुंबई निर्देशांकातील १७ समभाग वाढले; तर १२ समभागांचे मूल्य घसरले. हीरो मोटोकॉर्पचे समभागमूल्य सप्ताहअखेरच्या व्यवहारात स्थिर राहिले. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांक ०.२२ टक्क्य़ांपर्यंत वाढले.
नफ्यातील तब्बल ७५.९७ टक्के अशी धक्कादायक घसरण नोंदविणाऱ्या आयसीआयसीआय बँकेचा समभाग १.४८ टक्क्य़ांनी घसरला. तर एचसीएल टेक्नॉलॉजिजचे मूल्य थेट ६.१९ टक्क्य़ांनी आपटले. ३९ टक्के नफा घसरण नोंदविणारा आदित्य बिर्ला समूहातील आयडिया सेल्युलर ६.५२ टक्क्य़ांनी खाली आला.
सोने ३० हजार तर चांदी ४२ हजारानजीक
मुंबई : सराफा बाजारात मौल्यवान धातू दराने शुक्रवारी एकदम उसळी घेतली. स्टॅण्डर्ड सोने तोळ्यामागे ३२५ रुपयांनी वाढत २९,८२० रुपयांपर्यंत पोहोचले. तर शुद्ध सोन्याचा दर याच प्रमाणात आणि याच वजनासाठी २९,९७० रुपयांवर गेला. चांदीच्या दरातही शुक्रवारी मोठी वाढ नोंदली गेली. पांढरा धातू एकाच सत्रात ७८५ रुपयांनी वाढत ४१,८७५ रुपयांवर गेले. सोने व चांदीचे दर आता अनुक्रमे ३० हजार व ४२ हजार रुपयांनजीक पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातू त्याच्या सात आठवडय़ांच्या वरच्या टप्प्यावर पोहोचले असताना येथे मात्र लग्नाच्या हंगामाने घेतलेला वेग दरवाढीस कारणीभूत ठरल्याचे मानले जात आहे.

रुपया भक्कम
मुंबई : डॉलरच्या तुलनेत रुपया सप्ताहअखेरच्या व्यवहारात १९ पैशांनी उंचावला. परकी चलन विनिमय मंचावर स्थानिक चलन ६६.३३ वर स्थिरावले. ६६.४८ या तेजीसह सुरुवात करणाऱ्या रुपयाने व्यवहारात ६६.२८ पर्यंत झेप घेतली. तर त्याचा सत्रातील तळ हा ६६.५६ होता. चलन गुरुवारी ८ पैशांनी घसरले होते.
खनिज तेल पाच महिन्यांच्या उच्चांकावर
लंडन : आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर पुन्हा एकदा दरवेग पकडत असून शुक्रवारी ते प्रति पिंप ४५ डॉलरनजीक पोहोचले. खनिज तेलाचा हा गेल्या पाच महिन्यातील वरचा स्तर आहे. नोव्हेंबर २०१५ मध्ये काळे सोने ४६ डॉलरच्या आसपास होते.