• सेन्सेक्सची व्यवहारात २९ हजाराला गवसणी
  • १८ महिन्यांत निफ्टी पहिल्यांदाच ८९०० पल्याड
  • निर्देशांकांची दोन महिन्यांतील सर्वोत्तम सत्रझेप

अमेरिकेतील रोजगार वाढीविषयीची सुमार आकडेवारी पुढे आल्यानंतर तेथील मध्यवर्ती बँक – फेडरल रिझव्‍‌र्हद्वारे लगेचच व्याजदर वाढ संभवणार नाही, या आशेने भांडवली बाजारात गुंतवणूकदारांना मंगळवारी उत्साह प्रदान केला. परिणामी  झालेल्या जोरदार खरेदीने सेन्सेक्सने सप्ताहारंभीच १७ महिन्यांतील वरच्या टप्प्याकडे कूच केली.

दिवसअखेर शुक्रवारच्या तुलनेत मुंबई निर्देशांक तब्बल ४४५.९१ अंशांची उसळी घेत २९ हजारानजीक, २८,९७८.०२ वर पोहोचला, तर १३३.३५ अंश वाढीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,९४३.०० पर्यंत गेला आहे. निफ्टीची ही गेल्या १८ महिन्यांतील सर्वोत्तम पातळी ठरली आहे.

सलग तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर सेन्सेक्सची नव्या आठवडय़ाची सुरुवात सकाळच्या व्यवहारात तेजीसह झाली. अमेरिकेतील रोजगाराचे आकडे निराशाजनक राहिल्याने फेडरल रिझव्‍‌र्ह बँक आता डिसेंबर २०१६ पर्यंत व्याजदर वाढ होणार नाही, अशी आशा गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाली. त्यामुळे व्यवहारात सेन्सेक्स २९ हजारादेखील स्पर्श करता झाला. सत्रातील त्याची झेप २९,०१३.४० पर्यंत पोहोचली.

दोन्ही निर्देशांकांची मंगळवारच्या सत्रातील झेप ही गेल्या दोन महिन्यातील सर्वोत्तम ठरली. टक्केवारीत ही वाढ १.५० पेक्षाही अधिक राहिली आहे. सेन्सेक्सचा मंगळवारअखेरची २९ हजारानजीकचा टप्पा हा १३ एप्रिल २०१५ मधील २९,०४४.४४ नंतरचा सर्वोच्च आहे. तर मंगळवारी ८,९५० नजीकचा प्रवास नोंदविणाऱ्या राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीची मंगळवारअखेरचा बंद स्तर हा ३ मार्च २०१५ च्या ८,९९६.२५ नंतरचा सर्वाधिक राहिला आहे.

टाटा मोटर्स सेन्सेक्समध्ये ७.१९ टक्क्यांसह सर्वाधिक वाढ नोंदविणारा समभाग ठरला. तर अ‍ॅक्सिस बँकेचे मूल्यही ६.१४ टक्क्यांपर्यंत वाढले. सेन्सेक्समध्ये वाढ नोंदविणाऱ्या अन्य २५ समभागांमध्ये आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, मारुती सुझुकी, एशियन पेंट्स, एनटीपीसी, गेल, स्टेट बंक, हिंदुस्थान यूनिलिव्हर, पॉवर ग्रिड, महिंद्र अँड महिंद्र यांचा समावेश राहिला.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये बँक, ग्राहकोपयोगी वस्तू, ऊर्जा, स्थावर मालमत्ता, तेल व वायू आदी जवळपास ३ टक्क्यांपर्यंत वाढ नोंदविणारे ठरले. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांक अनुक्रमे १.८४ व ०.९५ टक्क्यांनी उंचावले. डॉलरच्या तुलनेत गेल्या चार महिन्याच्या वरच्या टप्प्यावर पोहोचलेल्या स्थानिक चलनाच्या प्रवासझेपेची दखलही बाजाराने घेतली.

अ‍ॅक्सिस, टाटा मोटर्स चमकदार; तर अनेकांच्या वाटय़ाला मूल्यऱ्हास!

सुरुवातीपासून भरधाव वाढत असलेल्या बाजारात मंगळवारी अनेक कंपन्यांना मात्र मोठय़ा प्रमाणातील मूल्यऱ्हासाला सामोरे जावे लागले. पैकी अनेकांमधील घसरण ही तब्बल १० टक्क्यांपर्यंतची होती. सेन्सेक्समधीलच टीसीएस, विप्रो, आयटीसी कोल इंडियासारखे समभागही एक टक्क्यापर्यंत घसरण नोंदविणारे ठरले. त्याचबरोबर अन्य निर्देशांकातील ज्युबिलन्ट फूड्स, माईंड ट्री, आयनॉक्स विंडही मोठय़ा फरकाने घसरले. सेन्सेक्समधील टाटा मोटर्स (७.१९%) अ‍ॅक्सिस बँक (६.१४%) चमकदार ठरले.

तेजीला इंधन कुठून..?

सप्टेंबरअखेर समाप्त होणाऱ्या दुसऱ्या तिमाहीत कंपन्या वाढीव फायद्यातील निकाल दाखवतील, तसेच देशांतर्गत म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूकदारांचा ओघ पुन्हा दिसून येत आहे. हे घटक भांडवली बाजारातील तेजीत इंधन घालणारे ठरले आहेत.

  • विनोद नायर प्रमुख संशोधक, जिओजित बीएनपी पारिबा फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस