अमेरिकी सिनेटने आयत्या वेळी ‘फिस्कल क्लिफ’चे संकट टाळून, धनिकांवर वाढीव कराचा बोजा लादणाऱ्या तोडग्याला दिलेली मंजूरी ही जगभरच्या भांडवली बाजारांसाठी अमेरिकेकडून मिळालेला नववर्षांचा नजराणाच ठरली आहे. स्थानिक बाजारात ‘सेन्सेक्स’ व ‘निफ्टी’ या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी त्यामुळे २०१३ सालाची सुरुवात दमदार प्रत्येकी पाऊण टक्क्यांच्या वाढीसह मंगळवारी केली.
उल्लेखनीय म्हणजे निफ्टी निर्देशांकाने आज बाजार बंद होताना ४५.३५ अंशांची कमाई करीत ५,९५०.४५ वर विश्राम घेतला. निफ्टीची ही पातळी या निर्देशांकाच्या आगामी प्रवासातील महत्त्वपूर्ण तांत्रिक अडथळा स्तराला भेदणारी ठरली आहे. सेन्सेक्सनेही १९५०० च्या पल्याड म्हणजे आज १५४.५७ अंशांची झेप घेत १९५८१.२८ च्या स्तरावर विश्राम घेतला. बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅप या निर्देशांकांनी त्यापेक्षा सरस म्हणजे अनुक्रमे १.२४ टक्के आणि १.०२ टक्के अशी मुसंडी मारली.