भांडवली बाजाराचा जानेवारी ते मार्च २०१३ मधील प्रवास सर्वात सुमार राहिला आहे. या कालावधीत ‘सेन्सेक्स’ ३.०४ टक्क्यांनी केवळ घसरलाच नाही तर गेल्या पाच तिमाहीनंतर त्याने पहिली घसरणीचीही नोंद केली आहे. २०१२-१३ या चालू आर्थिक वर्षांतील शेवटच्या तिमाहीत मुंबई निर्देशांकाने तब्बल पाच तिमाहीनंतर प्रथमच घसरण राखली. जानेवारी ते मार्च दरम्यान ‘सेन्सेक्स’ ३.०४ टक्क्यांनी घसरला आहे. यापूर्वी डिसेंबर २०११ च्या तिमाहीतही ‘सेन्सेक्स’ ६.०७ टक्क्यांनी घसरला होता. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यानची ही घट त्यावेळी नजीकच्या कालावधीतील सर्वात मोठी घसरण ठरली होती. त्यानंतर यंदाच्या मार्च २०१३ अखेरच्या तिमाहीतील पहिली व सर्वात मोठी घसरण ठरली आहे. एप्रिल ते जून २०१२ दरम्यान निर्देशांक खालच्या टप्प्यावरच होता; मात्र यावेळी तो अवघ्या ०.१५ टक्क्यांच्या वरचा प्रवास करत होता. चालू आर्थिक वर्षांची शेवटची तिमाही सोडली तर भांडवली बाजाराचा उर्वरित तिमाहीतील प्रवास सकारात्मक राहिला आहे. ०.१५ टक्क्यांच्या किरकोळ वाढीसह पहिल्या तिमाहीची नोंद करणारा ‘सेन्सेक्स’ दुसऱ्या तिमाहीत थेट ७.६५ टक्क्यांच्या वाढीच्या टप्प्यावर पोहोचला होता. तिसऱ्या तिमाहीतील त्याची वाढ अधिक बोधट होत ३.५४ टक्क्यांपर्यंत आली. जानेवारी ते मार्चच्या तिमाहीने तर घसरणीचीच नोंद केली.
विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी यंदाच्या वर्षांत (जानेवारी ते मार्च २०१३ दरम्यान) १० अब्ज डॉलरच्या समभागांची खरेदी केली आहे. तर २०१२ मध्ये त्यांची खरेदी २४.५ अब्ज डॉलरची होती. तर स्थानिक संस्थागत गुंतवणूकदारांनी २०१३ मध्ये आतापर्यंत ४१,०११ कोटी रुपये खरेदी व एकूण २०१२ वर्षांत ५६,९१२ कोटी रुपयांचे समभाग विकले आहेत.

तिमाहीत बँका आपटल्या; दीड कोटींवर पाणी
ल्ल चालू आर्थिक वर्षांतील शेवटच्या तिमाहीत भांडवली बाजाराच्या तीन टक्के घसरणीत बँकांनाही मोठा फटका बसला आहे. या कालावधीत मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध बँका, बिगर बँकिंग वित्तसंस्थांचे बाजार भांडवल १ लाख ४३ हजार ६८२ कोटी रुपयांनी खालावले. एकूण बाजार भांडवलाच्या तुलनेत हे प्रमाण १४ टक्के आहे. बाजारातील विविध ५० सूचिबद्ध बँका, बिगर बँकिंग वित्तसंस्थांची मालमत्ता २८ मार्चअखेर १० लाख ४४ हजार ४०० कोटी रुपयांवर स्थिरावली आहे. सर्वाधिक फटका अर्थातच राष्ट्रीयीकृत स्टेट बँकेला २३ हजार कोटी रुपयांचा बसला आहे. तर खासगी क्षेत्रातील एचडीएफसी आणि आयसीआयसीआय या बँकांचे नुकसान अनुक्रमे १३ हजार कोटी रुपये व १२ हजार कोटी रुपये आहे.

सेन्सेक्स’चा घसरता प्रवास..
*  जानेवारी-मार्च २०१३             -३.०४%
* ऑक्टोबर-डिसेंबर २०१२        +३.५४%
* जुलै-सप्टेंबर २०१२                +७.६५%
* एप्रिल-जून २०१२                  +०.१५%
* जानेवारी-मार्च २०१२             +१२.६१%