27 February 2021

News Flash

शेअर बाजाराची ऐतिहासिक कामगिरी… सेनसेक्सने ५० हजारांचा तर NIFTY १४,७०० चा टप्पा ओलांडला

अवघ्या नऊ सत्रांमध्ये सेन्सेक्सने एक हजार अंकाची उसळी घेतली

(संग्रहित छायाचित्र) (फोटो सौजन्य: रॉयटर्स)

मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्सने इतिहासात पहिल्यांदाच ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. गुरुवारी व्यवहार सुरु झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच शेअर बाजाराने उसळी खात ५० हजारांचा टप्पा ओलांडला. ४० हजारांवरुन ५० हजारांपर्यंतचा टप्पा ओलांडण्यासाठी बीएसईला तीन महिन्यांचा कालावधी लागला. विशेष म्हणजे अवघ्या नऊ सत्रांमध्ये सेन्सेक्सने एक हजार अंकाची उसळी घेतली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १४,७०० पर्यंत उंचावला. शेअर बाजाराने ५० हजारांचा टप्पा ओलांडला असला तरी या क्षेत्रातील जाणकारांनुसार येणाऱ्या काही दिवसांमध्ये शेअर बाजारात मोठे चढ-उतार पहायला मिळू शकतात. २०२१ च्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारामध्ये अनेक घडामोडी घडतील असं सांगितलं जात आहे.  अमेरिकेच्या नवनियुक्त अध्यक्ष व उपाध्यक्षांचा शपथविधी झाल्यानंतर जागतिक महासत्तेद्वारे जाहीर होणाऱ्या अर्थसाहाय्याच्या आशेवर भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक नव्याने शिखरावर पोहोचल्याचेही सांगितले जात आहे.

टीप्स टू ड्रेडचे सहसंस्थापक आणि शेअर बाजार विश्लेषक असणाऱ्या ए. आर. रामचंद्रन यांनी फायनॅन्शियल एक्सप्रेस ऑनलाइनला दिलेल्या माहितीनुसार सध्या शेअर बाजारामध्ये वृद्धीचे वातावरण दिसत आहे. सध्या बाजारामध्ये मोठ्याप्रमाणात खरेदी होत असल्याने शेअर बाजाराने ५० हजारांचा टप्पा ओलांडल्याचे रामचंद्रन यांनी स्पष्ट केलं आहे.

कोणात्या शेअर्सची झाली खरेदी

आज सकाळी बाजार सुरु झाला तेव्हा रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल), इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, कोटक महिंद्रा बँक, अ‍ॅक्सेस बँक यासारख्या बड्या कंपन्यांच्या शेअर्सची मोठ्याप्रमाणात खरेदी करण्यात आली. एस अ‍ॅण्ड पी बीसीएसई मीडकॅप इंडेक्सने ०.६९ टक्क्यांनी किंवा १३२ अंकांनी उसळी घेत १९ हजार २८८ चा टप्पा गाठला. तर बीएसईचा स्मॉलकॅप इंडेक्स ०.६८ टक्के किंवा १२६.८६ अंशांनी वधारला आणि १८ हजार ८७० पर्यंत गेला. ऑक्टोबर ते डिसेंबरच्या तिमाहीपेक्षा यंदा बाजारातील वातावरण अधिक सकारात्मक असेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. करोनाची लस, जागतिक बाजारपेठेतील आशादायक चित्र या साऱ्याचा बाजारावर सकारात्कम परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे.

बायडेन इफेक्ट…

अमेरिकेचे अध्यक्ष व उपाध्यक्षांचा शपथविधी बुधवारी उशिरा पार पडला. तेव्हा १.९ लाख कोटी डॉलरच्या अर्थसाहाय्यावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची आशा निर्माण झाली आहे. अमेरिकेच्या नवनियुक्त अर्थमंत्री जेनेट येलेन यांनीही त्याबाबतचे सुतोवाच केले आहे.

डिसेंबर २०२१ पर्यंत…

लॉकडाऊनसारख्या करोना प्रतिबंधित निर्बंध घोषणेनंतर तळाला पोहोचलेले निर्देशांक एप्रिल २०२० पासून आता ८० टक्के वर आहेत. डिसेंबर २०२१ पर्यंत निफ्टी १५,००० चा टप्पा पार करेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2021 10:08 am

Web Title: sensex hits 50000 nifty tops 14700 new all time highs for india stock market indices scsg 91
Next Stories
1 सेन्सेक्स, निफ्टी नव्याने शिखरावर
2 ‘थिंकक्युअर२०’द्वारे संसर्गजन्य आजारावरील आयुर्वेदिक औषधनिर्मिती
3 राज्यांवर गहिरे आर्थिक संकट!
Just Now!
X