28 September 2020

News Flash

तेजीचे पुनरागमन

‘सेन्सेक्स’ची ७४८ अंश मुसंडी

संग्रहित छायाचित्र

सलग चार दिवस सुरू राहिलेल्या घसरणीला रोखत,  मंगळवारच्या व्यवहारात भांडवली बाजारात तेजीवाल्यांनी धडाकेबाज पुनरागमन करीत सूत्रे हाती घेतली. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत, तसेच रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँकेसारख्या वजनदार समभागांमधील जोमदार खरेदी यामुळे निर्देशांकांना मोठी मुसंडी घेता आली.

मुंबई शेअर बाजार निर्देशांक – सेन्सेक्सने ७४८.३१ अंशांची कमाई करीत मंगळवारचे व्यवहार आटोपले तेव्हा ३७,६८७.९१ ची पातळीवर गेले. बरोबरीने राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकाने सोमवारच्या तुलनेत २०३.६५ अंशांची भर घालत दिवसाअखेरीस ११,०९५.२५ ही पातळी गाठली. दोन्ही निर्देशांकात अनुक्रमे २.०३ टक्के आणि १.८७ टक्के अशी वाढ दिवसाच्या व्यवहारांतून साधली गेली.

सर्वाधिक वाढ करणाऱ्या समभागांमध्ये, रिलायन्स इंडस्ट्रीज ७.१० टक्क्यांच्या वाढीसह सेन्सेक्समधील सर्वाधिक कमाई करणारा समभाग ठरला. फ्युचर समूहाचा किरकोळ विक्री क्षेत्रातील व्यवसाय रिलायन्सकडून संपादित केली जाण्याची चर्चेतून ही समभाग खरेदी झाली. आदित्य पुरी यांचे उत्तराधिकारी म्हणून रिझव्‍‌र्ह बँकेकडून पहिल्या पसंतीच्या शशीधर जगदीशन यांच्या नावावर शिक्कामोर्तब यामुळे एचडीएफसी बँकेचा समभाग ३.९४ टक्क्यांची सकारात्मक झेप घेताना दिसला.

आरोग्यनिगा क्षेत्रातील वॉखार्ट लिमिटेडचे समभाग सलग तिसऱ्या दिवशी वाढले. अ‍ॅस्ट्राझेन्का आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून विकसित होत असलेल्या करोना प्रतिबंधक लसीच्या विकसनात वॉखार्टने ब्रिटिश सरकारसोबत भागीदारी करार केला आहे. परिणामी मंगळवारी १० टक्क्यांच्या कमाल (अप्पर सर्किट) वाढ साधत हा समभाग ३३४ रुपयांवर स्थिरावला. त्या उलट देशांतर्गत प्रवासी वाहनांच्या व्यवसायातील ४९ टक्के विक्रीला काढणार असल्याच्या वदंतेमुळे, टाटा टाटा मोटर्सच्या समभागात दीड टक्क्यांची घसरण दिसून आली.

जागतिक स्तरावर युरोपातील भांडवली बाजारात नरमाईने सुरुवात झाली. मद्य निर्मात्या डियाज्जिओ आणि बायर यांच्या वाईट तिमाही कामगिरीचा प्रतिकूल परिणाम युरोपीय बाजारांवर दिसून आला. करोना आजारसाथीची दुसरी लाट येण्याच्या व्यक्त केल्या जाणाऱ्या शक्यता आणि त्यापायी चिंतांचाही युरोपीय बाजारांवर परिणाम दिसून आला.

स्थानिक बाजारात मात्र विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून चांगली खरेदीचा सुखावणारा अनुभव गुंतवणूकदारांना आला. उल्लेखनीय म्हणजे खरेदीचा जोर सर्वव्यापी म्हणजे स्मॉल-मिडकॅपमध्येही होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 12:15 am

Web Title: sensex hits 748 points abn 97
Next Stories
1 एचडीएफसी बँकेच्या प्रमुखपदी शशिधर जगदीशन
2 सरकारी बँकांमधील हिस्सा ५१ टक्क्य़ांपर्यंत कमी करा : रिझव्‍‌र्ह बँक
3 निर्लेखित कर्ज प्रक्रियेबाबत गोपनीयता
Just Now!
X