नव्या आर्थिक वर्षांच्या व्यवहारातील सलग दुसऱ्या सत्रात निर्देशांकातील तेजी राखणाऱ्या मुंबई शेअर बाजाराने पुन्हा एकदा १९ हजाराला गाठले आहे. मंगळवारी एकाच सत्रात तब्बल १७६.२० अंश उडी घेत ‘सेन्सेक्स’ आता १९,०४०.९५ वर पोहोचला आहे.
सोमवारीही बाजाराने किरकोळ मात्र निर्देशांकातील वाढ नोंदविली होती. तर आजची सकारात्मक वाटचाल ही सलग चौथी आहे. गेल्या तिन्ही सत्रात मिळून १८३ अंश भर घातली गेली होती. मंगळवारच्या जवळपास २०० अंश वाढीमुळे बाजार १८ मार्चनंतरच्या उच्चांकी टप्प्यावर पोहोचला आहे.
दरम्यान, राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ ४३.७० अंश वाढीसह ५,७४८.१० वर गेला आहे. देशाच्या आर्थिक सुधारणांबाबत भारताबाहेरील दौऱ्यादरम्यान आश्वस्त विधानांचा चांगला परिपाक भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांच्या उत्साहावर दिसून येत आहे.
रिलायन्स, सन फार्मा, रिलायन्स कम्युनिकेशन्स, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, स्टरलाईट इंडस्ट्रिज, स्टेट बँक, इन्फोसिस, मारुती सुझुकी, जिंदाल स्टील असे समभाग वधारणेच्या यादीत होते. उत्तम कामगिरी पोलाद निर्देशांकाने २.०७ टक्के वाढीसह बजाविली.
सर्व १३ क्षेत्रीय निर्देशांत मंगळवारी तेजीत होते. तर ‘सेन्सेक्स’मधील ३० पैकी २३ समभागांचे मूल्य वधारले होते.
बाजारभाव हालचाल व निमित्त..
* सेन्सेक्स        १९,०४०.९५         +०.९३%
भारतीय अर्थव्यवस्थेबाबत केंद्रीय अर्थमत्री पी. चिदंबरम यांचे आश्वस्त विधान.
* सन फार्मा        रु. ८५१. ५०           +४.६१%
कंपनीने काही औषधांच्या किंमती वाढविण्याबाबत दिलेले संकेत.
* स्टरलाईट इंडस्ट्रिज    रु. ९३.१०          +३.७९%
कंपनीचा तुतिकोरिन प्रकल्प बंद करण्यास सर्वोच्च न्यायालयाने दिलेला नकार.
* रिलायन्स इंडस्ट्रीज    रु. ७९३.९५           +२.०३%
रिलायन्स कम्युनिकेशन्सबरोबर ऑप्टिक फायबरसाठी १,२०० कोटी रुपयांचा करार.
* रिलायन्स कम्युनिकेशन्स    रु. ६६.९०      +१७.१६%
रिलायन्स जिओबरोबरच्या करारामुळे ३७,३६० कोटी रुपयांच्या कर्जाचा भार काहीसा   हलका होणार.
* लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो    रु. १,४२२           +१.९८%
मार्चमध्ये ३,७०० कोटी रुपयांचे नवे कामकाम मिळाल्याबद्दल.