सोमवारी सप्ताहरंभी शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांनी सकारात्मकता दाखवून शुक्रवारच्या मोठय़ा तेजीत भर घातली. तरी प्रारंभिक सत्रात घेतलेली जवळपास २०० अंशांची मुसंडी सेन्सेक्सला टिकवता आली नाही आणि अवघ्या ५०.२९ अंशांच्या वाढीसह २४,४८५.९५ वर तो स्थिरावला. शेवटच्या टप्प्यात सुरू झालेल्या विक्रीने निफ्टीही ७,४५० पातळीखाली अवघ्या १३.७० अंश वाढीसह दिवसअखेर ७४३६.१५ या पातळीवर विसावला.
जागतिक स्तरावर युरोप आणि जपान या देशांकडून त्यांच्या अर्थगतीला चालना देण्यासाठी अर्थउभारीचे उपाय योजले जातील, या आशेने आशियाई बाजारांत दमदार तेजीचे वातावरण दिसून आले. ते पाहता स्थानिक बाजारातही निर्देशांकांनी मोठय़ा फरकाने वाढ नोंदवीत दिवसाची सुरूवात केली होती. भांडवली बाजाराप्रमाणे चलन बाजारात रुपयाही सत्राची शेवटी कच खात प्रति डॉलर २० पैशांनी घसरला.