सलग तिसऱ्या सत्रातील घसरण राखताना मुंबई शेअर बाजाराच्या ‘सेन्सेक्स’ने सोमवारच्या ३० अंश घसरणीने तीन आाठवडय़ाचाच्याही नीचांकाची नोंद केली. नव्या आठवडय़ाची सुरुवाती सकाळच्या सत्रात तेजीने करणारा भांडवली बाजार दिवसअखेर मात्र नकारात्मक स्थितीत बंद झाला.
सकाळच्या व्यवहारात जवळपास शतकी वाढ राखणारा मुंबई निर्देशांक याचवेळी १९,९०० या दिवसाच्या उच्चांकापर्यंत पोहोचला. दिवसअखेर बरोब्बर ३० अंशांने खाली येत १९,७५१.१९ वर स्थिरावला. विविध क्षेत्रीय निर्देशांकातील समभागांची नफेखोरीसाठी गुंतवणूकदारांनी विक्री केल्याने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ११.६५ अंश घसरणीसह ५,९८७.२५ वर आला.
सार्वजनिक उपक्रम, आरोग्य, ऊर्जा, तेल व वायू, पोलाद असे भक्कम समभाग नुकसानीला सामोरे गेले. याचबरोबर स्टेट बँक, आयटीसी, ओएनजीसी, सिप्ला, भेल यांनीही घसरण नोंदविली. तर एचडीएफसी, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक यांच्या समभागांचे मूल्य मात्र वधारले. १३ पैकी १२ क्षेत्रीय निर्देशांक घसरलेले होते. तर मिडकॅप, स्मॉलकॅपमध्येही एक टक्क्यापर्यंतची घट राखली गेली. ‘सेन्सेक्स’मधील ३० पैकी २० समभाग घसरले होते. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी वाहन, बांधकाम, ग्राहकोपयोगी वस्तू, बँक यासारख्या व्याजदराशी संबंधित समभागांची खरेदी केली. रिझव्‍‌र्ह बँकेने आठवडय़ापूर्वी दर कपात केल्यानंतर अनेक बँकांनीह कर्ज व्याजदर कमी केल्याचा हा परिणाम त्यांनी साधला.