जगभरात सर्वत्र करोना उद्रेकाने भांडवली बाजार गटांगळ्या खात असताना, आर्थिक वर्ष २०१९-२० ची अखेर मंगळवारी सेन्सेक्सने १,०२८ अंशांच्या दमदार उसळीसह केली. तथापि अनेक बाह्य़ नकारात्मक घडामोडींची छाया राहिलेल्या या आर्थिक वर्षांत सेन्सेक्स तब्बल २३.८० टक्क्यांनी गडगडला आहे.

करोना विषाणूजन्य साथीचा उगम जेथून झाला त्या चीनच्या अर्थव्यवस्थेत औद्योगिक क्रियाकलाप पूर्वपदावर आले असल्याचे निर्मिती क्षेत्राच्या मार्च महिन्यासाठी जाहीर झालेल्या निर्देशांकातून स्पष्ट झाल्याने जागतिक स्तरावर सर्वच बाजारात सकारात्मक वातावरण होते. त्याचे प्रतिबिंब स्थानिक बाजारातील व्यवहारांवर उमटलेले दिसून आले.

मंगळवारच्या व्यवहारात भांडवली बाजारात सर्वदूर उत्साही खरेदीचे चित्र दिसून आले. परिणामी सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही प्रमुख निर्देशांक अनुक्रमे ३.६२ टक्के आणि ३.८२ टक्के मुसंडीसह बंद झाले. सेन्सेक्स १,०२८.१७ अंश वाढीसह २९,४६८.४९ पातळीवर दिवसअखेर स्थिरावले. तर ३१६.६५ अंश वाढीसह निफ्टी निर्देशांकाने ८,५९७.७५ पातळीवर निरोप घेतला. मावळत्या आर्थिक वर्षांत सेन्सेक्स ९,२०४.४२ अंश (२३.८० टक्के) आणि निफ्टी ३,०२६.१५ अंश (२६.०३ टक्के) घसरणीत राहिला आहे.

सेन्सेक्समधील आयटीसीचा समभाग ७.४८ टक्के मूल्यवृद्धीसह सर्वाधिक वाढ नोंदविणारा ठरला, तर त्यापाठोपाठ रिलायन्स, ओएनजीसी, टाटा स्टील, टेक महिंद्र, सन फार्मा, स्टेट बँक हे वधारणारे समभाग ठरले. त्या उलट इंडसइंड बँक (१४.६८ टक्के), मारुती (१.२३ टक्के), बजाज फायनान्स (१.१७ टक्के) आणि टायटन (१.१३ टक्के) हे मंगळवारच्या व्यवहारात सेन्सेक्समधील घसरणारे समभाग ठरले.