वाहन समभागही अखेर तेजीच्या मार्गावर

मुंबई : अमेरिका-चीन व्यापार युद्धात संभाव्य समेटाच्या चर्चेने भांडवली बाजारात मंगळवारी सलग तिसरी निर्देशांक वाढ नोंदली गेली. सणाच्या मोसमात ग्राहकांकडून मागणी वाढण्याच्या आशेने गुंतवणूकदारांनी समभाग खरेदीचा क्रम कायम ठेवला.

व्यवहारात ४२१ हून अधिक अंशांनी झेप घेणारा सेन्सेक्स मंगळवार सत्रअखेर २९१.६२ अंश वाढीसह ३८,५०६.०९ वर पोहोचला. तर ८७ अंश वाढीमुळे निफ्टी ११,४२८.३० पर्यंत स्थिरावला. प्रमुख निर्देशांक आता त्यांच्या पंधरवडय़ाच्या वरच्या टप्प्यावर आहेत.

गेल्या काही महिने सलग मूल्य घसरण नोंदवणाऱ्या प्रामुख्याने वाहन क्षेत्रातील समभागांना मंगळवारी उत्साही मागणी राहिली. त्याचबरोबर पोलाद क्षेत्रातील समभागही वाढले. मुंबई निर्देशांकातील ३० पैकी २४ समभागांच्या मूल्यात भर पडली.

सेन्सेक्समधील वेदांता, महिंद्र अँड महिंद्र, ओएनजीसी, हीरो मोटोकॉर्प, मारुती सुझुकी, हिंदुस्थान यूनिलिव्हर आदी ३.७९ टक्क्यांपर्यंत वाढले. तर भारती एअरटेल, इन्फोसिस, टाटा मोटर्स, एचसीएल टेक, टेक महिंद्र, बजाज फायनान्स २.५३ टक्क्य़ांपर्यंत घसरण नोंदविणारे समभाग ठरले. प्रमुख निर्देशांक वाढूनही सहा समभागांना मूल्य घसरणीचा फटका बसला.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वाहन निर्देशांक सर्वाधिक २.३६ टक्के वाढीसह अग्रेसर राहिला. पोलाद, बँक, ऊर्जा आदी १.५६ टक्क्यांसह वाढले. तर दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान निर्देशांक २.१५ टक्क्यांसह घसरले. लार्ज कॅप, मिड कॅप वाढले. तर स्मॉल कॅप घसरला. सेन्सेक्सची तीन सत्रांतील वाढ ६२५.६९ टक्के, तर निफ्टीतील वाढ १९३.७५ टक्के राहिली.

रुपया महिन्याच्या तळात

अमेरिका-चीन व्यापार युद्धाच्या चर्चेचे पडसाद येथील परकीय चलन विनिमय मंचावरही मंगळवारी उमटले. डॉलरच्या तुलनेत रुपया आठवडय़ाच्या तिसऱ्या व्यवहारात थेट ३१ पैशांनी रोडावत ७१.५४ पर्यंत घसरला. सप्ताहारंभीच्या तुलनेत त्यातील ०.४४ टक्के घसरणीमुळे रुपया आता महिन्याभराच्या तळात पोहोचला आहे. यापूर्वी, १७ सप्टेंबर रोजी रुपयाचा स्तर ७१.७८ असा किमान स्तर होता. खनिज तेलाच्या किमती कमी होत असतानाच स्थानिक चलनातही मंगळवारी घसरण अनुभवली गेली. सलग दुसऱ्या सत्रातील घसरणीमुळे खनिज तेलाच्या किमती आता प्रति पिंप आता ६० डॉलरच्याही खाली आल्या आहेत.