देशांतर्गत अर्थव्यवस्था सावरत असल्याचे दर्शविणारी आकडेवारी आणि अमेरिकेतील अर्थ-प्रोत्साहक पॅकेजसंबंधी बळावलेला आशावाद हे घटक गुरुवारी भांडवली बाजाराला उत्साही वळण देणारे ठरले.

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत मजबूत बनलेले रुपयाचे विनिमय मूल्य आणि केंद्र सरकारकडून टाळेबंदीतील शिथिलतेतून उद्योग-व्यवसायांवरील अनेक प्रकारचे निर्बंध सैल केले गेल्याचे बाजारातील व्यवहारांवर तेजीपूरक परिणाम दिसून आले. यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ६२९.१२ अंशांची (१.६५ टक्के) झेप घेत ३८,६९७.०५ या पातळीवर दिवसअखेर स्थिरावला. दुसरीकडे अधिक व्यापक प्रतिनिधित्व असलेल्या निफ्टी निर्देशांकानेही १६९.४० अंशांच्या (१.५१ टक्के) कमाईसह ११,४१६.९५ या पातळीवर गुरुवारच्या व्यवहारांना निरोप दिला.

गुरुवारच्या व्यवहारात तेजीवाल्यांनी बाजारावर वर्चस्व गाजविले. खरेदीचा जोर इतका सशक्त होता की, सेन्सेक्समधील ३० पैकी २५ समभागांचे मूल्य दमदार वधारले. आयटीसी, एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, टायटन आणि ओएनजीसी या सेन्सेक्समधील उर्वरित पाच समभागांत अर्धा टक्क्याची जेमतेम घसरण दिसून आली.

देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने शुभसंकेत म्हणजे, जीएसटी संकलन सप्टेंबरमध्ये सहामाही उच्चांकावर गेले. देशाच्या निर्मिती क्षेत्रानेही उमदी सक्रियता दर्शवून साडेआठ वर्षांपूर्वीच्या सर्वोच्च ‘पीएमआय निर्देशांका’ची नोंद केली. परिणामी, गुंतवणूकदारांमध्ये बाजारात सर्वव्यापी खरेदीचा मूड दिसून आला. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातील पाऊण टक्क्याच्या वाढीने याचा दाखला दिला.

शुक्रवारी, गांधी जयंतीनिमित्त सार्वजनिक सुटी असल्याने बाजारात व्यवहार बंद असतील. त्यामुळे गुरुवारी  बाजारात सप्ताह-अखेरचे  व्यवहार झाले. साप्ताहिक स्तरावर सेन्सेक्सने १,३०८.३९ अंश (३.४९ टक्के) आणि निफ्टीने ३६६.७० अंश (३.३१ टक्के) अशी मोठी कमाई केली आहे.

रुपयाची ६३ पैशांची कमाई

मुंबई : भांडवली बाजारात मुख्यत: विदेशी गुंतवणूकदारांच्या समभाग खरेदीच्या उत्साहापोटी अमेरिकी डॉलरच्या वाढलेल्या मागणीचा सुपरिणाम रुपयाच्या विनिमय मूल्याच्या मजबुतीत गुरुवारी दिसून आले. आंतरबँक चलन बाजारात रुपयाच्या मूल्याने डॉलरच्या तुलनेत तब्बल ६३ पैशांनी सुदृढता मिळवली आणि डॉलरमागे ७३.१३ असा स्तर कमावला. बुधवारी रुपयाच्या विनिमय मूल्याचा स्तर ७३.७६ असा होता.