मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने सोमवारी नवीन ऐतिहासिक उच्चांक गाठला. दिवसअखेर १५४ अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स ४६,२५० अंकांच्या पुढे बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सुद्धा ४४ अंकांच्या वाढीसह विक्रमी १३,५५८ अंकांवर बंद झाला. आयसीआयसीआय बँक, एल अँड टी आणि कोटक बँकच्या शेअर्समध्ये वाढ झाली.

परकीय गुंतवणूकीचा ओघ बाजारात कायम आहे तसेच जागतिक शेअर बाजारातही चांगली स्थिती आहे. त्याचा सकारात्मक परिणाम मुंबई शेअर बाजारावर दिसून आला. आजच्या व्यवहाराच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराने ४६,३७३ ही ऐतिहासिक उंची गाठली होती. पण त्यानंतर काही अंकांची घट होऊन बाजार ४६,२५३ अंकांवर बंद झाला.

निफ्टी १३,५५८ अंकांवर बंद झाला असला तरी, निफ्टीने सुद्धा १३,५९७ हा सार्वकालीन उच्चांक गाठला होता. आज ONGC च्या शेअर्सला चांगलाचा फायदा झाला. त्यानंतर एल अँड टी, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, सन फार्मा, एचसीएल टेक, टायटन आणि कोटक बँकच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.