मुंबई : सलग दोन व्यवहारातील निर्देशांक घसरणीनंतर भांडवली बाजाराने बुधवारी तेजी नोंदविली. चीनमधील करोना व्हायरसच्या प्रसार आणि त्याचे चीनसह जागतिक अर्थव्यवस्थेवर संभवणारे परिणामाबाबतची चिंतेची छाया गेल्या सलग दोन व्यवहारात दिसून आली होती. बुधवारी मात्र कंपन्यांच्या तिमाही वित्तीय निष्कर्षांचे गुंतवणूकदारांकडून स्वागत करण्यात आले.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स बुधवारअखेर २३१.८० अंश वाढीसह ४१,१९८.६६ वर पोहोचला. तर ७३.७० अंश वाढीने निफ्टीने १२,१२९.५० पर्यंत स्थिरावला. मुंबई निर्देशांकाचा बुधवारचा प्रवास ४१,१०८.१९ ते ४१,३३४.८६ असा वरचा राहिला.

बजाज फायनान्स सर्वाधिक, जवळपास पाच टक्के वाढीसह मुंबई निर्देशांक अव्वल राहिला. त्याचबरोबर नेस्ले इंडिया, आयटीसी, इन्फोसिस, एनटीपीसी आदीही वाढले. तर टीसीएस, एचडीएफसी लिमिटेड, सन फार्मा, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, अ‍ॅक्सिस बँक आदींचे मूल्य मात्र घसरले.