अखेरच्या दिवशी सेन्सेक्समध्ये द्विशतकी भर घालत व निफ्टीला आठ हजारांनजीक नेऊन ठेवत गुंतवणूकदारांनी संवत्सर २०७०चा बुधवारी निरोप घेतला. मावळत्या संवत्सरात सेन्सेक्समध्ये ५,५००हून अधिक अंशांची वाढ राखत मुंबई शेअर बाजाराने गेल्या पाच संवतातील सर्वोत्तम कामगिरी बजाविली. देशात आगामी कालावधीतही आर्थिक सुधारणांना वेग येणार असल्याचा आशावाद व्यक्त करत बाजार विश्लेषकांनीही नव्या संवत्सराचे भाकीत ३० हजारांवर नेऊन ठेवले आहे.
संवत्सर २०७०च्या अखरेची तयारी भांडवली बाजाराने मोठय़ा उत्साहाने केली होती. गेल्या सलगच्या चारही सत्रांत यामुळे सेन्सेक्स ७८७.८९ अंशांनी वाढला. सोमवारी तर एकाच व्यवहारात ३२१ अंशांची उडी घेत बाजाराने अधिक गती नोंदविली. तर बुधवारच्या २११.५८ अंश वधारणेने मुंबई निर्देशांक २६,७८७.२३ या गेल्या महिन्याभराच्या वरच्या टप्प्यावर पोहोचला. ६८.१५ अंश वाढीमुळे निफ्टीही आठ हजारानजीक, ७९९५.९० गेला. प्रमुख निर्देशांक आता महिन्यातील उच्चांकी टप्प्यावर आहेत.
बुधवारी मुंबईच्या भांडवली बाजारात वाहन, भांडवली वस्तू, औषध निर्माण कंपन्यांचे समभाग वधारले. सेन्सेक्समधील हीरो मोटोकॉर्प, टाटा मोटर्स, मारुती सुझुकी या कंपनी समभागांमध्ये ४.०३ टक्क्यांपर्यंतची वाढ नोंदली गेली. सणानिमित्त क्षेत्राला असलेल्या मागणीमुळे वाहन निर्देशांकदेखील तेजीत आघाडीवर राहिला.
बुधवारपूर्वी सेन्सेक्स २२ सप्टेंबर रोजी २७,२०६.७४ या टप्प्यावर होता. तर ३० सप्टेंबरनंतर निफ्टीने व्यवहारात प्रथमच ८ हजारांचा टप्पा गाठला होता. बंदअखेर तो ओलांडण्यात मात्र राष्ट्रीय शेअर बाजाराला यश आले नाही. संवत २०७०मध्ये गुंतवणूकदारांची एकूण मालमत्ता ९३.१४ लाख कोटी रुपये झाली आहे. गेल्या संवस्तराचा अखेरचा दिवस काहीसा उशिरा, १ नोव्हेंबर २०१३ रोजी होता. दरम्यान, एनएसईएलच्या विलीनीकरण निर्णयानंतर मंगळवारी आपटलेला फायनान्शिअल टेक्नॉलॉजीजचा समभाग बुधवारी काहीसा सावरला. ६ टक्के वाढीसह समभाग मूल्य उंचावत कंपनीचे बाजार भांडवलही ४७ कोटींची वधारले.

२५ लाख कोटींच्या कमाईचे सवंत्सर!
मावळते संवत्सर २०७०मध्ये म्हणजे मागल्या वर्षांच्या दिवाळीच्या लक्ष्मीपूजनापासून बुधवापर्यंत सेन्सेक्समध्ये ५,५४७.८७ अंशांची भर पडली आहे. ही वाढ २६.१२ टक्के इतकी असून, गेल्या पाच संवत्सर वर्षांतील ती सर्वोत्तम वृद्धी ठरली आहे. यापूर्वी संवत्सर २०६५ मध्ये (२००९ सालच्या दिवाळीपर्यंतच्या वर्षांत) सेन्सेक्सने ८,८१३.२६ अंशांची कमाई केली होती. आधीच्या वर्षांपेक्षा त्यातील वाढ तब्बल १०३.५७ टक्के होती. संवत्सर २०७०मध्ये गुंतवणूकदारांची मालमत्ता २५ लाख कोटी रुपयांनी वाढली आहे.

आज सायंकाळी मुहूर्ताचे विशेष सौदे
तेजीसह संवत्सराची अखेर केल्यानंतर भांडवली तसेच चलन बाजार आता थेट सोमवारी व्यवहार होणार आहेत. दिवाळी निमित्ताने गुरुवार व शुक्रवारी दोन्ही बाजारांत नियमित व्यवहार होणार नाहीत. मात्र गुरुवारी – लक्ष्मीपूजनानिमित्त मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजारात मुहूर्ताचे विशेष सौदे होणार आहेत. सायंकाळी ६.१५ ते ७.३० या दरम्यान नव्या संवत्सराच्या स्वागताचे व्यवहार होणार आहेत.

फल मात्रा दुप्पट!
संवस्तरात २६० समभागांचा १०० टक्क्यांनी परतावा !
पाच वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी बजाविणाऱ्या संवस्तर २०७०मध्ये २६० हून अधिक समभागांनी १०० टक्क्यांहून अधिक वाढ नोंदविली आहे. पैकी ११४ समभांचे मूल्य तर तब्बल २०० टक्क्यांनी वधारले आहे. १०० टक्क्यांहून अधिक मूल्य तेजी नोंदविणारे समभाग हे बीएसई ५००, मिड कॅप व स्मॉल कॅप गटातील आहेत.
गेल्या वर्षभरात मुंबई शेअर बाजाराच्या व्यासपीठावरील मिड व स्मॉल कॅप निर्देशांकांमध्ये अनुक्रमे ७२ व ५२ टक्के भर पडली आहे. या श्रेणीत अवंती फीड्स, मार्कसन्स फार्मा, गती, टीव्हीएस मोटर कंपनी, सिएट, जे. के. लक्ष्मी सिमेंट, ग्लोबल ऑफशोअर सव्‍‌र्हिसेस, किटेक्स गार्मेट्स, सीसीएल इंटरनॅशनल, एलजी बालकृष्णन या कंपन्यांचा समावेश आहे. लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, अ‍ॅक्सिस बँक, मारुती सुझुकी, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भेल या सेन्सेक्समधील कंपन्यांनी मावळत्या संवत्सरात ५० टक्क्यांनी अधिक तेजीची कामगिरी बजाविली आहे.
eco04