सेन्सेक्ससह निफ्टीत किरकोळ घसरण
सलग दोन व्यवहारातील तेजीच्या जोरावर असलेल्या भांडवली बाजारात नफा कमाविण्याच्या हेतूने सप्ताहारंभी गुंतवणूकदारांनी हेरलेल्या समभाग खरेदी धोरणामुळे प्रमुख भांडवली निर्देशांकांनी सप्ताहारंभीच किरकोळ घसरण नोंदविली. भारताच्या विकास दराबाबतची चिंता, जागतिक बाजारात नरमाईचे वातावरण हे सारे एकूण निर्देशांकात आपटी नोंदविण्यास निमित्त ठरले.
व्यवहारात २६ हजाराच्याही खाली येणारा सेन्सेक्स दिवसअखेर २५.९३ अंश घसरणीसह २६,१९२.९८ वर थांबला. तर अवघ्या ४.८० अंश घसरणीसह राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७,९७७.१० वर स्थिरावला. सत्रात त्याने ७,९०८.३५ ते ७,९८७.९० दरम्यान प्रवास केला.
नव्या आठवडय़ाची सुरुवात भांडवली बाजाराने तेजीसह केली होती. मात्र व्यवहारातच मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २६ हजाराच्याही खाली आला होता. सत्रात शुक्रवारच्या तुलनेत तब्बल २५० अंशांची आपटी अनुभवल्यानंतर सेन्सेक्सने २५,९७२.५४ हा व्यवहाराचा तळही अनुभवला. सत्राच्या मध्यापर्यंत हे वातावरण होते. दिवसअखेर मोठी घसरण थांबली. मात्र त्यात वाढ नोंदली गेली नाही. व्यवहारादरम्यान सेन्सेक्स २६,२३३.४६ पर्यंत पोहोचू शकला. त्याचा हा गेल्या तीन आठवडय़ाचा उच्चांक टप्पा होता. सेन्सेक्सने गेल्या आठवडय़ातील सलग दोन व्यवहारात ५१२.९८ अंश भर नोंदविली होती. अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हच्या व्याजदर कपातीची आशा व प्रत्यक्षात तसे न झाल्यावरची ही संमिश्र प्रतिक्रिया होती.
सोमवारच्या व्यवहारात सेन्सेक्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज हा सर्वाधिक, १.९४ टक्के घसरणीसह आघाडीवर राहिला. तर मिहद्र अ‍ॅन्ड मिहद्र, आयटीसी, भारती एअरटेल, डॉ. रेड्डीज यांच्या समभाग मूल्यात घसरण झाली.
वधारलेल्या समभागांमध्ये मारुती सुझुकी, हिंदाल्को, अ‍ॅक्सिस बँक, स्टेट बँक, गेल, टाटा मोटर्स यांचा समावेश राहिला. सेन्सेक्समधील १७ समभागांचे मूल्य घसरले. तर क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये तेल व वायू, ग्राहकोपयोगी वस्तू, पोलाद यांच्यात घसरण नोंदली गेली.
एकूण मुंबई निर्देशांक घसरणीसह बंद झाला असला तरी बाजारातील स्मॉल व मिड कॅप निर्देशांकांमध्ये अनुक्रमे १.२१ व ०.४४ टक्के वाढ नोंदली गेली. मुंबई शेअर बाजारात सोमवारी चर्चेतील अनेक समभागांनी अस्वस्थता अनुभवली. गोव्यातील मालमत्ता मलेशियाच्या कंपनीला विकल्यानंतर हॉटेल लीला व्हेंचर्सचा समभाग व्यवहारादरम्यान ७.४७ टक्क्य़ांनी उसळला.
दिवसअखेर मात्र त्यात किरकोळ, अध्र्या टक्क्य़ाची वाढ नोंदली गेली. तर स्पर्धक रेनबॅक्सीचे दोन विभाग खरेदी केल्यामुळे सन फार्माच्या स्ट्राईड्स अ‍ॅर्कोलॅबचे मूल्य सत्रअखेरही ४.५० टक्क्य़ांहून अधिक उंचावते राहिले.

‘प्रभात’ची बाजारात संथ सुरुवात
तयार दुग्धजन्य पदार्थ निर्मिती व विक्री क्षेत्रातील प्रभात डेअरीची नोंद सोमवारी भांडवली बाजारात विशेष ठरली नाही. प्रति समभाग किंमत ११५ रुपये जाहीर केल्यानंतर कंपनीला मुंबई शेअर बाजारात व्यवहारअखेर केवळ १.१७ टक्का अधिक भाव (रु. ११६.३५) मिळाला. सत्रादरम्यान तो १२० रुपयांपर्यंत वर तर ११२.४० या तळातील टप्प्यात होता. कंपनीची भाग विक्री प्रक्रियेसाठीची नोंदणी २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान झाली होती. मुंबई शेअर बाजारात नोंद करण्यासाठी कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक विवेक निर्मल तसेच अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सारंगधर निर्मल हे उपस्थित होते.

एनटीपीसीच्या रोख्यांसाठी  बुधवारपासून प्रक्रिया
सार्वजनिक ऊर्जा क्षेत्रातील एनटीपीसीचे रोखे अखेर येत्या बुधवारी खुले होणार आहेत. कंपनी सादर करत असलेल्या रोख्यांमध्ये ४० टक्के हिस्सा – २४० कोटी रुपयांचे रोखे हे किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. यासाठी कंपनीची प्रक्रिया २३ सप्टेंबर रोजी सुरू होईल. ३० टक्के प्राप्तिकर दात्याच्या गटातील वर्गाला २० वर्षांसाठीच्या रोख्यांवर १०.८८ टक्के व्याज मिळेल. याबाबतच्या प्रस्तावाला केंद्र सरकारची मान्यता मिळाल्याचे कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ए. के. झा यांनी सोमवारी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितले. सध्याच्या ७.५० ते ८.७५ टक्क्यांच्या मुदत ठेवींच्या दराच्या तुलनेत यातील गुंतवणूक लाभदायी ठरण्याचा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. कंपनी १०, १५ व २० वर्षे मुदतीचे रोखे उपलब्ध करून देत आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना त्यासाठी अनुक्रमे ७.३६, ७.५३ व ७.६२ टक्के व्याज मिळेल. केंद्र सरकारने जुलैमध्ये १,००० कोटी रुपयांच्या रोखे सादर करण्याची घोषणा केली होती. यामध्ये एनटीपीसीच्या या ७०० कोटी रुपयांच्या निधी उभारणीचाही समावेश आहे. सरकारने राखलेल्या सार्वजनिक कंपन्यांच्या निर्गुतवणुकीच्या उद्दिष्टांमध्ये एनटीपीसीचाही क्रम आहे.