कर सुधारणांचा मार्ग निर्धोक होताना पाहून गुंतवणूकदारांनी बुधवारी भांडवली बाजारात खरेदीचा जोर लावला. त्याचबरोबर पूर्वपदावर आलेल्या मान्सूनमुळे येणाऱ्या पतधोरणात व्याजदर कपात होण्याची आशाही बाजारात व्यक्त केली गेली.
हे चित्र बुधवारी सेन्सेक्सला ३२२.७९ अंशांची झेप घेण्यास भाग पाडणारे ठरले. एकाच व्यवहारातील १.१५ टक्के वाढीमुळे निर्देशांक २८,५०४.९३ पर्यंत पोहोचला, तर शतकी वाढीमुळे निफ्टी ८,६३३.५० वर बंद झाला. निफ्टीतही बुधवारी १०४.०५ अंश भर पडली.
आधीच्या सलग दोन व्यवहारांत सेन्सेक्सने २८१.१७ अंशांची घसरण अनुभवली आहे. कंपन्यांच्या निराशाजनक तिमाही निकालावरची ही प्रतिक्रिया होती. बुधवारच्या जवळपास सव्वा टक्के निर्देशांक वाढीने आता निर्देशांक १६ एप्रिलनंतरच्या वरच्या टप्प्यावर पोहोचला आहे.
वस्तू व सेवा कर विधेयकाला निवड समितीने मान्यता दिल्यानंतर या संदर्भातील विधेयक आता राज्यसभेत पारित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या आशेवर गुंतवणूकदारांनी बाजारात खरेदी केली. लोकसभेत हे विधेयक यापूर्वीच मान्य झाले आहे.
अर्थसुधारणेवरून बाजाराने गेल्या काही सत्रांमध्ये सातत्याने चिंता व्यक्त केली होती. वस्तू व सेवा कर विधेयकासह जमीन हस्तांतरण विधेयक, कामगार कायदा विधेयकाच्या सुरळीत मार्गाबाबत बाजारात व्यवहार होताना शंका व्यक्त केली गेली आहे.
आगामी प्रवास निराशाजनक राहण्याची भीती व्यक्त केलेल्या सन फार्माचा समभागही मंगळवारची आपटी सोडत बुधवारी तब्बल ३.३५ टक्क्यांनी उसळला. रिलायन्स इंडस्ट्रीजनेही थेट ४ टक्क्यांची वाढ नोंदविली. कंपनीचे पहिल्या तिमाहीचे वित्तीय निष्कर्ष येत्या शुक्रवारी जारी होत आहेत.
सेन्सेक्समधील २२ कंपन्यांचे समभाग वाढले. तेजीत राहिलेल्या समभागांमध्ये महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, बजाज ऑटो, एचडीएफसी, हिंदुस्थान युनिलिव्हर, टाटा स्टील, विप्रो, सिप्ला, एनटीपीसी, गेल इंडिया, ओएनजीसी, कोल इंडिया, मारुती सुझुकी, हीरो मोटोकॉर्प यांचा समावेश राहिला. तर क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये तेल व वायू, बँक, वाहन, ऊर्जा निर्देशांक वाढले. व्याजदर कपातीच्या आशेवर वाढलेल्या बँक निर्देशांकांमध्ये आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक, एचडीएफसी बँक यांनी २.३६ टक्क्यांपर्यंतची वाढ नोंदविली. मुंबई शेअर बाजारातील स्मॉल व मिड कॅप निर्देशांकामध्ये अनुक्रमे ०.८६ व १.३० टक्के वाढ झाली.
बाजाराच्या बुधवारच्या मोठय़ा तेजीच्या प्रवासाबाबत जिओजित बीएनपी पारिबा फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेसचे संशोधक प्रमुख अलेक्स मॅथ्यूज म्हणाले की, निफ्टीला ८,६०० वर ठेवण्यात बुधवारी आघाडीच्या कंपन्यांनी खऱ्या अर्थाने हातभार लावला. तर याच संस्थेच्या तांत्रिक संशोधन मंचाचे सहअध्यक्ष आनंद जेम्स यांनी अर्थसुधारणा अपेक्षांच्या लाटेवर स्वार होत गुंतवणूकदारांनी बुधवारी खरेदीची संधी साधली, असे सांगितले. बुधवारच्या तेजीला अर्थसुधारणांच्या अपेक्षांची जोड असल्याचे निरीक्षण हेम सिक्युरिटीजचे संचालक गौरव जैन यांनीही नोंदविले.