रुपयाचं डॉलरच्या तुलनेतलं ढासळतं मूल्य व आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिका व चीनमध्ये सुरू असलेलं व्यापार-युद्ध याचा विपरीत परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला. गुंतवणकूदारांमध्ये या घडामोडींमुळे आलेल्या निरुत्साहापोटी सोमवारी शेअर्सची विक्री करण्याचा कल राहिला, परिणामी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स हा निर्देशांक दिवसभरात ५०५.१३ अंकांनी घसरला.

सेन्सेक्सने ५०० पेक्षा जास्त अंकांचा फटका खाल्ला व तो ३७,५८५.१५१ वर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा निर्देशांकही १३७.४५ अंकांनी घसरून ११,३७७.७५ वर बंद झाला. दोन्ही निर्देशांक साधारणपणे १.२० टक्क्यांनी दिवसभरात घसरले. भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत सोमवारी ७१.८० वरून एका टक्क्यानं घसरून ७२.७० वर स्थिरावला. अनावश्यक आयात कमी करण्याबरोबरच विदेशातून भारतात होणारा कर्जपुरवठा सुलभ करणं, भारतीय कर्जरोख्यांसदर्भातले नियम शिथिल करणे आदी उपाय रुपयाला भक्कम करण्यासाठी योजण्याचे सूतोवाच केंद्र सरकारने केले होते. परंतु हे उपाय तुटपुंजे आहेत आणि त्यांचा रुपयाची पडझड थांबवण्यासाठी फारसा उपयोग होणार नाही, असा तज्ज्ञांचा कयास असून त्याचे प्रतिबिंबच सोमवारी बाजारात उमटले.

त्याखेरीज चीन व अमेरिका यांच्यामधला व्यापारी वाद संपण्याची चिन्हे नसून अमेरिका चिनी मालावर आणखी काही निर्बंध लादण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात चिंतेच वातावरण आहे. याचाही विपरीत परिणाम भारतीय शेअर बाजारात दिसून आला आहे.