भांडवली बाजारात गुरुवारी पुन्हा नफेखोरी अनुभवली गेली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १३३.६५ अंश घसरणीने २८,६६६.०४ वर स्थिरावताना सप्ताह तळात विसावला. ४३.५० अंश घसरणीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,७०६.७० वर थांबला.
टाटा समूहातील टीसीएसच्या सायंकाळी जाहीर होणाऱ्या वित्तीय निकालांवर नजर ठेवत गुंतवणूकदारांनी एकूणच माहिती तंत्रज्ञान निर्देशांकातील समभागांची विक्री केली. तर तेजीतील क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ०.९३ टक्क्यांसह तेल व वायू निर्देशांक राहिला.
कालच्या घसरणीनंतर दिवसाची सुरुवात तेजीने करणारा सेन्सेक्स व्यवहारात ३०० अंशांपर्यंत खाली आला होता. तेल व वायूसारख्या समभागांमध्ये काहीशी खरेदी अनुभवली गेल्याने मुंबई निर्देशांकाचे दिवसाचे नुकसान अखेर काही प्रमाणात भरून निघाले. मात्र सत्रअखेर बुधवारप्रमाणे घसरणीतच झाली. सेन्सेक्स बुधवारी जवळपास २४५ अंशांनी घसरला होता. मार्चमधील महागाई दर सलग पाचव्या महिन्यात उणे स्थितीत राहूनही बाजाराने बुधवारी सकारात्मक प्रतिक्रिया दिली नाही.
गुरुवारच्या बंद स्तरामुळे सेन्सेक्सने ७ एप्रिलचा २८,५१६.५९ नजीकचा टप्पा आता गाठला आहे, तर बुधवारी ८,८०० चा स्तर सोडणारा निफ्टी त्यापासून आणखी दूर गेला आहे. सत्रअखेर ८,७०० च्या काठावर येऊन ठेपणाऱ्या निफ्टीचा सत्रप्रवास ८,६४५.६५ पर्यंत घसरला होता. सेन्सेक्समधील १८ समभाग घसरणीच्या यादीत राहिले, तर १२ समभागांचे मूल्य उंचावले.