येत्या आठवडय़ात पतधोरण जाहीर करणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेसाठी भांडवली बाजाराने बुधवारी अनोख्या व्यवहारांच्या पायघडय़ा घातल्या. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सलग तिसऱ्या सत्रांत ८६.५५ अंशांनी वधारताना २,३३७.६७ अशा सर्वोच्च स्थानी विराजमान झाला.
बुधवारी २५.१५ अशी वाढ नोंदवीत राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक ६,३३८.९५ या दुसऱ्या मोठय़ा टप्प्यावर पोहोचला. मुंबई निर्देशांक ९ डिसेंबरनंतर प्रथमच विक्रमी स्तरावर पोहोचला, तर निफ्टीने याच सत्रातील समकक्ष पातळी गाठली.
रिझव्‍‌र्ह बँकेचे आगामी तिमाही पतधोरण येत्या मंगळवारी जाहीर होत आहे. डिसेंबरमधील किरकोळ तसेच घाऊक महागाई निर्देशांक कमालीचा खाली आल्याने यंदा व्याजदर कपातीबाबत समस्त उद्योग क्षेत्राला आशा आहे. गुंतवणूकदारांच्या बाबतही हेच वातावरण असून बुधवारी त्यांनी सेन्सेक्सला सलग तिसऱ्या व्यवहारात तेजी नोंदविण्यास भाग पाडले. दुपारपूर्वी स्थिर असणारा मुंबई शेअर बाजार नंतर मात्र अधिक वाढू लागला. परिणामी, दिवसअखेर तो ९ डिसेंबर २०१३ च्या २१,३२६.४२ या सर्वोच्च पातळीवरही गेला.
असे करताना सेन्सेक्सने गेल्या तीन सत्रांत २४७.०५ अंश वाढ राखली आहे, तर निफ्टीही आता ९ डिसेंबरच्याच ६,३६३.९० या सर्वोच्च स्तरापासून काहीसा लांब आहे. चार राज्यांत एकाच पक्षाला मिळालेल्या निर्विवाद बहुमतातील विधानसभा निवडणूक निकालाच्या जोरावर भांडवली बाजारांनी यापूर्वीच सर्वोच्च टप्पा गाठला होता.
सेन्सेक्समधील सन फार्मा, टाटा स्टील, हिंदाल्को, भारती एअरटेल, एनटीपीसी, महिंद्र अ‍ॅण्ड मिहद्र, डॉ. रेड्डीज लॅब, सिप्ला, विप्रो, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस यांच्या समभागांची खरेदी झाली. त्यांचे समभाग मूल्य १.०४ ते २.८५ टक्क्यांपर्यंत उंचावले. स्टेट बँक, एल अ‍ॅण्ड टी, हीरो मोटोकॉर्पसारखे बडे समभाग मात्र आजच्या एकूण निर्देशांक तेजीतही रोडावले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये आरोग्य निगा सर्वाधिक तेजीत राहिला. उत्तम वित्तीय निष्कर्षांमुळे टोरन्ट फार्मा, एचडीएफसीदेखील वधारले. सेन्सेक्समधील २० कंपनी समभागांचे मूल्य वाढले.