मध्यवर्ती बँकांच्या व्याज दराबाबत धोरण नरमाईने केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय भांडवली बाजारात मंगळवारी चैतन्य निर्माण केले. महिन्यासह चालू आर्थिक वर्षांच्या वायदापूर्तीच्या अखेरच्या दिनापूर्वी सेन्सेक्ससह निफ्टी निर्देशांकांनी बुधवारी दमदार झेप नोंदविली.
मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात एकाच व्यवहारात ४३८.१२ अंश वाढ नोंदविल्याने सेन्सेक्स २५,३३८.५९ वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात एका सत्रातील १३८.२० अंश वाढीने निफ्टीला ७,७०० पुढील, ७,७३५.२० पर्यंत मजल मारता आली. यामुळे गेल्या सलग दोन व्यवहारांतील घसरणीलाही या रूपाने खीळ बसली.
६ जानेवारी २०१६ नंतरचा सर्वात मोठा बंद टप्पा मुंबई निर्देशांकाने बुधवारी राखला, तर बुधवारची निर्देशांकाची झेप ही गेल्या महिन्याभरातील सर्वात मोठी ठरली. गुरुवारी संपत असलेल्या मार्च महिन्यातील तसेच २०१५-१६ मधील वायदापूर्तीच्या अखेरच्या दिवसापूर्वी गुंतवणूकदारांकडून खरेदीकरिताही प्राधान्य दिले गेले.
बुधवारच्या व्यवहारामुळे गुंतवणूकदारांची मालमत्ताही एकाच व्यवहारात १.६२ लाख कोटी रुपयांनी वाढली.
रिझव्‍‌र्ह बँकेच्या संभाव्य व्याज दरकपातीचे पतधोरण येत्या आठवडय़ात येऊन ठेपले असतानाच अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हच्या प्रमुखांनीही जूनपूर्वी व्याज दरवाढ होणार नाही, अशी ग्वाही दिल्याने आशियाई बाजारात याचे सकारात्मक पडसाद उमटले.

‘निफ्टी ईटीएफ’चे तैवान बाजारात व्यवहार
निफ्टी निर्देशांकावर आधारित एक्स्चेंज ट्रेडेड फंडाचे (ईटीएफ) व्यवहार आता तैवान शेअर बाजारात सुरू झाले आहेत. या बाजारात व्यवहार होत असलेली ही पहिलीच भारतीय ईटीएफ योजना आहे. तैवानस्थित फ्युबन अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीद्वारे तीन ईटीएफ – फ्युबन निफ्टी ईटीएफ, फ्युबन निफ्टी २ एक्स लीव्हरेज्ड इंडेक्स ईटीएफ आणि फ्युबन निफ्टी-१ इन्व्हर्स इंडेक्स ईटीएफ अशा तीन योजना तेथे सुरू केल्या आहेत. या तीन निर्देशांकांची रचना एनएसईची उपकंपनी इंडिया इंडेक्स सव्‍‌र्हिसेस अँड प्रॉडक्ट्स लि. या कंपनीनेच केली आहे. या योजनांतून तेथील गुंतवणूकदारांना अल्प खर्चात भारतीय बाजाराच्या प्रगतीचा वेध घेणारी गुंतवणूक करता येईल. तैवानमधील सूचिबद्धतेसह निफ्टी निर्देशांकांवर आधारित ईटीएफमध्ये गुंतवणुकीची संधी १९ जागतिक बाजारांत उपलब्ध झाली आहे.