करोना प्रतिबंधक लस निर्मात्या कंपन्यांच्या वाढत्या संख्येसह तिच्या परिणामकारकतेच्या दाव्याची पातळी वाढत असल्याबद्दल भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये समभाग खरेदी हुरूप दिसून आला. यामुळे सेन्सेक्सने इतिहासात प्रथमच ४४,५०० पुढील टप्पा गाठला. तर निफ्टीने पहिल्यांदाच १३ हजारांपुढचा स्तर नोंदविला.

मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक मंगळवारी ४४५.८७ अंशांनी झेपावत ४४,५२३.०२ वर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत १२८.७० अंशांची भर पडून निर्देशांक १३,०५५.१५  वर स्थिरावला. दोन्ही  निर्देशांकात प्रत्येकी एक टक्क्य़ांची भर पडली.

सेन्सेक्समध्ये अ‍ॅक्सिस बँक, महिंद्र अँड महिंद्र, एचडीएफसी बँक, आयटीसी, स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, मारुती सुझुकी, कोटक महिंद्र बँक, सन फार्मा ४ टक्क्यांपर्यंत वाढले. तर एचडीएफसी लिमिटेड, टायटन कंपनी, नेस्ले इंडिया, भारती एअरटेल, ओएनजीसी, इन्फोसिसमध्ये दीड टक्क्यापर्यंत घसरण झाली.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये दूरसंचार वगळता इतर सर्व निर्देशांक तेजीच्या यादीत राहिले. त्यातही बँक, वित्त, वाहन, स्थावर मालमत्ता, पोलाद यामध्ये अधिक वाढ राहिली.

दमदार विदेशी गुंतवणूक ओघ

निर्देशांकांच्या विक्रमी उच्चांकी झेपेला ही विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांच्या धुवाँधार खरेदीनेच बळ दिले आहे. चालू नोव्हेंबर २०२० या महिन्यांत विदेशी संस्थागत गुंतवणूक ही दोन दशकांमध्ये सर्वोत्तम राहिली आहे. २३ नोव्हेंबपर्यंत तिने ५०,९८९ कोटी रुपयांची मात्रा गाठली आहे, तर चालू वर्षभरात ती १.३१ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडणारी ठरली आहे. अमेरिकेतील निवडणुकांचा निकाल आणि डॉलर कमकुवत बनत असल्याचे दिसल्यानंतर विदेशातील गुंतवणुकीचा ओघ लक्षणीय वाढला आहे. करोना साथीच्या दुसऱ्या लाटेने बेजार युरोप-अमेरिकेतील मध्यवर्ती बँकांकडून अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनासाठी मोठय़ा रकमेचे उत्तेजनात्मक पॅकेज खुले करण्याच्या आशावादाने भारतातील गुंतवणुकीचा ओघ बहरत आहे.

विदेशी गुंतवणुकीचा ओघ पाहता बाजाराचा एकंदर दृष्टिकोन सकारत्मक आहे. परिणामी निफ्टी निर्देशांक १३,२००, १३,४०० अथवा त्यापुढची आजवर न पाहिलेली पातळीही दाखवू शकेल. तथापि सणोत्सवापश्चात बाजारपेठांमधील ग्राहकांचा उत्साह कितपत टिकाव धरतो आणि अर्थवृद्धीच्या दिशेने त्याचे परिणाम पाहावे लागतील. सावधगिरी म्हणून गुंतवणूकदारांनी अंशत: नफावसुली करून घ्यावी आणि निर्देशांकांची दौड थंडावून घसरणीच्या स्थितीत मूल्यात्मक खरेदीसाठी हा पैसा वापरावा.

– हेमांग जानी, समभागसंलग्न रणनीतीचे प्रमुख,  मोतीलाल ओस्वाल फायनान्शियल सर्व्हिसेस.