अनोखे शिखर आणि लक्षणीय परताव्यासह २०२० वर्षांला निरोप देणाऱ्या भांडवली बाजाराने निर्देशांक विक्रमाची परंपरा नव्या, २०२१ वर्षांरंभीही कायम ठेवली. गेल्या सलग तीन सत्रांपासून हुलकावणी देणारा १४ हजारांचा टप्पा निफ्टीने अखेर आठवडय़ाच्या शेवटच्या बंदसत्रात गाठलाच. तर शुक्रवारच्या शतकी अंशभरामुळे सेन्सेक्सला नव्या विक्रमासह ४७,८०० पुढे जाता आले.मुंबई निर्देशांक सप्ताहअखेरच्या व्यवहार समाप्तीला गुरुवारच्या तुलनेत ११७.६५ अंशवाढीने ४७,८६८.९८ वर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक ३६.७५ अंशवाढीमुळे १४,०१८.५० पर्यंत स्थिरावला.

सत्रात दोन्ही निर्देशांक अनुक्रमे ४८,९८०.३६ व १४,०४९.८५ पर्यंत पोहोचले होते. आठव्या सत्रातील तेजीमुळे प्रमुख निर्देशांक या दरम्यान ५ टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या तिमाहीतील वित्तीय निष्कर्षांच्या येत्या पंधरवडय़ातील घोषणेच्या आशेवर माहिती तंत्रज्ञान, तर डिसेंबरमधील वाढत्या विक्रीमुळे वाहनक्षेत्रातील कंपन्यांचे समभागमूल्य वाढले.
सेन्सेक्समध्ये आयटीसी सर्वाधिक, २.३२ टक्क्यांनी वाढला. तसेच टीसीएस, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, स्टेट बँक, भारती एअरटेलनाही मागणी राहिली.

डिसेंबर २०२० मधील सरकारच्या एक लाख रुपयांपुढील वस्तू व सेवा कर संकलनाने गुंतवणूकदारांमध्ये समभाग खरेदीहुरूप दिसला.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये दूरसंचार, भांडवली वस्तू, माहिती तंत्रज्ञान निर्देशांक १.४० टक्क्यांपर्यंत वाढले. सप्ताह तुलनेत सेन्सेक्स व निफ्टी अनुक्रमे ८९५.४४ व २६९.२५ अंशांनी वाढले.

रुपयाचा तेजीप्रवास नव्या वर्षांतही कायम

दरम्यान, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य सप्ताहअखेर ४ पैशांनी वाढून ७३.११वर स्थिरावले. शुक्रवारच्या तेजीरूपात परकीय चलन विनिमय मंचावरील स्थानिक चलनाचा प्रवास सलग सहाव्या सत्रात वाढीचा राहिला आहे. वर्ष २०२० अखेरच्या सत्राला रुपयाने घसघशीत अशा २४ पैशांची भर टाकल्याने त्याचा गेल्या दोन महिन्यांतील सर्वोत्तम स्तर गाठला होता. त्याचा तेजीप्रवास नव्या वर्षांच्या पहिल्या सत्रातही कायम राहिला.