अमेरिकी रोख्यांवरील वाढते व्याज, सीरियावरील संभाव्य हल्ला, भारताच्या विकास दराबाबतची शंका या साऱ्यांचा विपरीत परिणाम शुक्रवारी भांडवली बाजारात नोंदला गेला. एकाच व्यवहारातील जवळपास २,००० अंश आपटीने सेन्सेक्स थेट ५०,००० खाली आला.

करोना-टाळेबंदी वर्षपूर्तीला, वैश्विक संकटारंभीचीच निर्देशांक हालचाल शुक्रवारीही नोंदली गेली. सेन्सेक्सने मे २०२० मधील, निफ्टीने मार्च २०२० मधील सत्रआपटी शुक्रवारी मागे टाकली. निफ्टी ४ टक्क्य़ांनी गडगडला. मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना ५.३७ लाख कोटींचा फटका बसला.

अमेरिकेतील रोख्यांवर अधिक व्याज मिळत असल्याने भांडवली बाजारात गुंतवणूक कमी होण्याच्या धास्तीने विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी आठवडय़ाच्या शेवटच्या सत्रात समभाग विक्रीचा जोरदार सपाटा लावला, तर विकास दराबाबतच्या आकडेवारीने देशांर्तगत गुंतवणूकदारांनीही त्यांना साथ दिली.

यामुळे भांडवली बाजारात वर्षभरातील सुमार सत्रव्यवहाराची नोंद सप्ताहाखेर नोंदली गेली. सेन्सेक्सने ४ मे २०२० नंतर शुक्रवारी मोठी घसरण अनुभवली. तर निफ्टी यापूर्वी, २३ मार्च २०२० ला सर्वात मोठी सत्रआपटी नोंदविणारा निर्देशांक ठरला होता. शुक्रवारी भांडवली बाजारात सप्ताहाखेरचे तर नव्या महिन्यातील वायदापूूर्तीचे प्रारंभीचे व्यवहार होते. चालू सप्ताहारंभी तसेच सप्ताहाखेरिस प्रमुख निर्देशांकांनी मोठी निर्देशांक आपटी नोंदविली. सेन्सेक्स व निफ्टी हे त्यांच्या विक्रमी टप्प्यापासून आणखी दूर गेले.

सेन्सेक्समध्ये सर्व ३० समभाग घसरणीच्या यादीत राहिले. त्यातही आघाडीच्या समभागांचे मूल्य थेट ५ टक्क्य़ांहून अधिक प्रमाणात रोडावले, तर क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये बँक, वित्तचा दबाव ५ टक्क्य़ांपर्यंत राहिला.

रुपयाचे १०४ पैशांनी अवमूल्यन

विदेशी चलन विनिमय मंचावर शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत स्थानिक चलन थेट रुपयाने खाली आले. रुपयात १०४ पैशांची घसरण होऊन तो सत्रअखेर ७३.४७ वर स्थिरावला. भांडवली बाजारातून विदेशी गुंतवणूकदारांच्या काढत्या पाय धोरणाने डॉलरची मागणी वाढून रुपयावर दबाव निर्माण झाला. रुपयाने ५ ऑगस्ट २०१९ नंतर प्रथमच सुमार सत्र हालचाल शुक्रवारी नोंदवली. आठवडय़ात रुपया ८२ पैशांनी कमकुवत झाला आहे.

समभाग मूल्याची दमदार रेल‘चेल’!

एकाच व्यवहारातील जवळपास ४ टक्के घसरणीच्या भांडवली बाजारात रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची मात्र शुक्रवारी दमदार नोंदणी झाली. गेल्या आठवडय़ात राबविण्यात आलेल्या प्रारंभिक खुल्या भागविक्री प्रक्रियेसाठी निश्चित करण्यात आलेल्या किंमतपट्टय़ाच्या तुलनेत जवळपास ३० टक्के अधिक मूल्य सार्वजनिक कंपनीच्या समभागाला पहिल्याच व्यवहारात मिळाले. मुंबईच्या शेअर बाजारात प्रति समभाग १०४.६० रुपयाने सुरुवात करणारा रेलटेलचा समभाग सत्रात १२५.५० पर्यंत झेपावल्यानंतर अखेर १२१.४० वर बंद झाला.