सेन्सेक्स महिन्याच्या नव्या तळात
गेले काही दिवस सलगपणे सुरू असलेली घसरण गुरुवारी अधिक विस्तारताना सेन्सेक्सला त्याच्या महिन्यातील नव्या तळात घेऊन गेली. निफ्टी निर्देशांकानेही भावनिकदृष्टय़ा महत्त्वाचा ८,००० चा स्तर सोडला. गुरुवारचे शेवटच्या टप्प्यातील मतदान आणि येत्या रविवारी निकाल जाहीर होणाऱ्या बिहारच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करत गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याचे दिसून येते.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २४८.७२ अंश घसरणीसह २६,३०४.२० वर येऊन ठेपला. मुंबई निर्देशांक १ ऑक्टोबरनंतर किमान पातळीवर स्थिरावला. तर ८४.७५ अंश घसरणीसह राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,००० चा स्तर सोडत दिवसअखेर ७,९५५.४५ वर बंद झाला.
चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाने ६५.७७ पर्यंत नोंदवलेली घसरणही बाजाराने गंभीरतेने घेतली. डिसेंबरपासून व्याजदर वाढविण्याचे संकेत अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हच्या अध्यक्षांनी दिल्यानंतर आशियासह युरोपातील बाजारांमध्ये झालेल्या घसरणीचा परिणाम येथेही जाणवला.
शेअर बाजारात सलग सहा व्यवहारांत घसरण नोंदली गेली होती. चालू आठवडय़ात मंगळवार सोडता पुन्हा तोच कित्ता गिरवला गेला. किरकोळ वाढीसह सुरुवात होणाऱ्या बाजाराच्या गुरुवारच्या सत्रात निर्देशांक लगेचच नकारात्मक वाटचाल करते झाले. परिणामी सेन्सेक्स दिवसअखेरही त्याच स्थितीत मोठय़ा घसरणीसह स्थिरावला. तर निफ्टीचा सत्रातील प्रवास ८,०३१.२० ते ७,९४४.१० दरम्यान राहिला.
सेन्सेक्समधील २३ समभागांचे मूल्य रोडावले. त्यातही वेदान्ता, सन फार्मा, टाटा स्टील, भेल, भारती एअरटेल, गेल, सिप्ला, अ‍ॅक्सिस बँक हे घसरणीत आघाडीवर राहिले. दरम्यान, कोल इंडिया, एनटीपीसी, हिरो मोटोकॉर्प, आयटीसी, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, मारुती सुझुकी या समभागांना मात्र गुंतवणूकदारांकडून पसंती मिळाली.
क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये स्थावर मालमत्ता निर्देशांकाला घसरणीचा २.६३ टक्क्यांपर्यंतचा फटका बसला. पाठोपाठ आरोग्यनिगा, बँक, तंत्रज्ञान निर्देशांकही घसरले. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांकांमध्येही तब्बल दीड टक्क्याची आपटी अनुभवली गेली.