सलग तिसऱ्या व्यवहारात समभागांवर गुंतवणूकदारांचा विक्री दबाव

मुंबई : भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकांत तिसरी घसरण नोंदली गेली. सेन्सेक्ससह निफ्टी बुधवारी गुंतवणूकदारांच्या समभाग विक्रीच्या माऱ्याने आणखी खाली आले.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सत्रात मंगळवारच्या तुलनेत तब्बल ७०० अंशांनी खाली प्रवास करत होता. मात्र सत्रअखेर तो १३५.०५ अंश घसरणीसह ५२,४४३.७१ वर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३७.०५ अंश घसरणीने १५,७०९.४० पर्यंत आला. दोन्ही निर्देशांकांत जवळपास पाव टक्क्याची घसरण झाली.

येथील भांडवली बाजाराचा प्रवास सलग दुसऱ्या सत्रात नकारात्मक असा जागतिक निर्देशांकांच्या दबावाखाली प्रवास करता झाला. परिणामी मुंबई निर्देशांकाने ५२,५०० चा स्तरही बुधवारी सोडला.

सेन्सेक्समधील प्रमुख ३० कंपनी समभागांमध्ये कोटक महिंद्र बँकेचे समभाग मूल्य सर्वाधिक, २.६४ टक्क्यांनी घसरला. त्याचबरोबर डॉ. रेड्डीज्, महिंद्र अँड महिंद्र, पॉवरग्रिड, एनटीपीसी, एचडीएफसी बँक, नेस्ले इंडिया आदीही घसरणीच्या यादीत राहिले. भारती एअरटेल थेट ५ टक्क्य़ांनी झेपावला. तसेच टाटा स्टील, इंडसइंड बँक, बजाज फिनसव्‍‌र्ह, आयसीआयसीआय बँक, अल्ट्राटेक सिमेंट आदीही २.६० टक्क्यांपर्यंत घसरले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वाहन, बँक, बहुपयोगी वस्तू, स्थावर मालमत्ता, ग्राहकोपयोगी वस्तू, ऊर्जा निर्देशांक एक टक्क्यापर्यंत घसरले. तर दूरसंचार, पोलाद, माहिती तंत्रज्ञान, भांडवली वस्तू आदी काही प्रमाणात वाढले. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप स्थिर राहिले.