भांडवली बाजारातील निर्देशांक तेजी सलग दुसऱ्या व्यवहारांतही कायम राहिली. बँक, वित्त समभागांच्या जोरावर सेन्सेक्स तसेच निफ्टीने मंगळवारअखेर सप्ताहारंभी सत्राच्या तुलनेत प्रत्येकी एक टक्क्याहून अधिक वाढ नोंदवली.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स एकाच व्यवहारात ५५७.६३ अंशवाढीसह ४८,९४४.१४ वर पोहोचला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सत्रातील १६८.०५ अंशवाढीमुळे १४,६५३.०५ पर्यंत स्थिरावला.

कंपन्यांच्या तिमाही वित्तीय निष्कर्षामुळे सेन्सेक्सला पुन्हा ५० हजारांनजीक तर निफ्टीला १४,५०० पुढे जाता आले.

सेन्सेक्समध्ये बांधकाम व अभियांत्रिकी क्षेत्रातील लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोचे समभाग मूल्य सर्वाधिक, ३.३३ टक्क्यांनी उंचावले. त्याचबरोबर बजाज फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रिज, इंडसइंड बँक, स्टेट बँक, एचडीएफसी बँक, भारती एअरटेलही वाढले.

गेल्या तिमाहीत नफ्यातील घसरण नोंदवणाऱ्या मारुती सुझुकीचा समभाग जवळपास सव्वा टक्क्यासह घसरणीच्या यादीत अग्रणी होता. तसेच एनटीपीसी, नेस्ले इंडिया, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, डॉ. रेड्डीज्, अ‍ॅक्सिस बँकही अर्ध्या टक्क्यापर्यंत घसरले.

मुंबई शेअर बाजारातील सर्व, १९ क्षेत्रीय निर्देशांक तेजीच्या यादीत होते. त्यातही पोलाद, भांडवली वस्तू, ऊर्जा निर्देशांकांतील वाढ जवळपास ३ टक्क्यांपर्यंत होती. बीएसई मिड कॅप व स्मॉल कॅप १.४९ टक्क्यांपर्यंत वाढले.

दरम्यान, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य काही प्रमाणात घसरले, तर आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमतीमध्ये काहीशी वाढ नोंदली गेली.