आशियाई भांडवली बाजारातील घसरणीला साथ देत, बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांकांनी घसरण नोंदवली. करोनावरील लशीबाबत नकारात्मक वृत्ताचा बाजारावर विपरीत परिणाम झाला. किरकोळ व्यवसायातील विदेशी गुंतवणुकीचे पाठबळ मिळालेल्या रिलायन्ससारख्या भक्कम कं पनी समभागाचीही मूल्यवाढही निर्देशांकातील घसरण रोखू शकली नाही.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स बुधवारी १७१.४३ अंश घसरणीसह ३८,१९३.९३ वर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३९.३५ अंश घसरणीने ११,२७८ वर बंद झाला. मुंबई निर्देशांकाने व्यवहारात मंगळवारच्या तुलनेत ४३० अंश वाढ नोंदवली होती. मात्र बँक, वित्त क्षेत्रातील समभागांच्या विक्री सपाटय़ाने बाजाराच्या प्रमुख निर्देशांकाला सत्रअखेर तेजी कायम राखता आली नाही.

बुधवारी भांडवली बाजाराचे व्यवहार सुरू होण्यापूर्वीच रिलायन्सने तिच्या किरकोळ विक्री व्यवसायातील १.७५ टक्के  हिस्सा अमेरिकी वित्तसंस्था सिल्व्हर लेक पार्टनर्सला ७,५०० कोटी रुपयांना विकल्याची घोषणा केली. यामुळे रिलायन्सच्या समभागासह एकूणच निर्देशांक तेजीत होते. मात्र पुढे करोना साथीवरील लस विकसित करण्यात अ‍ॅस्ट्राझेनेका फार्माला आलेल्या अडथळ्यानेही बाजारातील गुंतवणूकदारांनी चिंता व्यक्त केली.

सेन्सेक्समध्ये स्टेट बँक सर्वाधिक, ४.४६ टक्क्यांसह घसरणीत अग्रेसर राहिला. त्याचबरोबर बजाज फायनान्स, अ‍ॅक्सिस बँक, बजाज फिनसव्‍‌र्ह, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्र बँक, एचडीएफसी बँक आदीही घसरले. तर टाटा स्टील, रिलायन्स, सन फार्मा, भारती एअरटेल, एशियन पेंट्स यांचे समभाग मूल्य ३ टक्क्यापर्यंत वाढले.

बँक, वित्तसह माहिती तंत्रज्ञान, स्थावर मालमत्ता निर्देशांक २.१४ टक्क्यापर्यंत घसरले.